मेंदूतल्या कोणत्याही खिडकीतून
बाहेर डोकावलं की
तुझं विराट दर्शन घडतं
तू गाण्यात
तू स्वरात
तू तालबद्ध
तू शब्दांत
तू कवितेत
तू प्रतिमाप्रतिकांत
तू आमच्या अडाणी पाठयपुस्तकात
ठाण मांडून बसलेलीयेस
तू आमच्या भोळयाभाबडया मेंदूत
जाळं विणून बसलेलीयेस
तू धर्माइतकी चिवटयेस
तू माणसाइतकी प्राचीनयेस
तू गांडूळाइतकी लिबलीबीतयेस
बॉलीवुडच्या तमाम हिरॉयनी
झक मारतात तुझ्या लवचिकतेसमोर
हे जगद्व्यापी
तू डॉटकॉमची जननी
नारळातलं आपसूक पाणी
रसाळ तुझी वाणी
तुला अवगत सर्व भाषा
सर्व लिप्या तुझ्या अंकित
तरीही तु अलिखीत
आमच्या सर्व भाषा तुझ्या
इंपोर्टेड बाटलीतलंच दुध चोखतात
आमच्या सर्व बोली
तुझ्या व्यावहारीक पादण्यात गुदमरतात
तू सत्संगाची भाषा बोलतेस
अस्खलीत जाहिरातीतल्यासारखी
जाहिरातीतली भाषा तू
अंगवळतेस आमच्यात सत्संगासारखी
तुला तुझं टाकाऊ फायबर ठेवायला
कमी पडली जमीन
आणि सायबरच्या कोंडवाडयात
तू निर्माण केलीस अनलिमीटेड स्पेस
तू वेगाला सेकंदाच्या गिचमीडीत घुसवलंस
तू वेळेला वक्तशीर केलंस रीयल टार्इममध्ये
तू खिळवून ठेवलंस आम्हाला खुर्चीत
तू गोठवून टाकलास आमचा घाम
आमच्या तहानेला तु बॉटलबंद केलंस
आमच्या भुकेला तू आध्यात्मिक उंचीपर्यंत भिडवलंस
आमच्या कपडयालत्त्यात तुझं 100% कॉटनाय
आमच्या मुलाबाळांच्या गळयात
तुझीच एक्झीक्यूटीव टायाय
आमच्या कुटूंबकबिल्याचं
तुझ्याशी पिझ्झाबर्गरचं नातंय
आमचे मेडिटेशनेबल आत्मापरमात्मा
तुझ्या फाइवस्टार मठात आत्मदंगयेत
आमचे सर्व ईश्वर तुझ्या पायाशी लोटांगतायेत
तू ईश्वरपुत्रालादेखील लावतेस रितसर धंदयाला
आम्हाला बनवतेस त्याचं ऑफिशल अनुयायी
तू लोकशाहीची नाडी आवळून
तिच्या छाताडावर थयथय नाचतेस
नंतर चुकून कोणी घुसवलंच विमान तुझ्या छाताडात
तर अख्खा अफगाणीस्तान बेचिराख करायला लावतेस
मोदी असो किंवा मनमोहन
तू करत नाहिस भेदभाव दोघांच्याही दाढीत तिळमात्र
चे असो किंवा दांडीयात्रेतला गांधी
तू त्यांना आमच्या टिशर्टावर रंगवून
तुझा नफेखोर इतिहास आणखी उजळ करतेस
तुला वारा विझवू शकत नाही
भिजवू शकत नाही तुला पाणी
तुकडे तुकडे झाले तरी तुझं लिक्विड
एकसंध होतं पुन:पुन्हा
नव्याने नव्या अवतारात
नव्या प्रकारे थयथयाट करण्यासाठी
हे जगद्व्यापी जगद्जननी
किती पॄथ्व्यांचा चेंदामेंदा
करणारहेस तू