मेंदूतलं मॅजिक

सांगितल्याप्रमाणे मग मी स्क्रोल डाऊन करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोवर क्लिक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोखाली लाईक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी कमेंटमध्ये एटीएट लिहितो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोतलं मॅजिक पाहतो.

मग हे सगळं मी नसतं केलं तरी चाल्ल अस्त असं वाट्ट.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी अपडेट अॅपचं बटन दाबतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी स्पेस रिकामी करण्यासाठी डेटा डिलिट करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी डोकं रिकामी करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी नव्याने डोकं भरून टाकतो.

मग मी आतल्या आत नव्याने भरलेलं डोकं कौतुके पाहतो.

मग माझ्या डोक्यातलं कौतुक आटत जातं.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी लॉगावूट होतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी दोन्ही हात पोटावर ठेवून पोटाला रेकी देतो.

सांगितल्याप्रमाणे मग मला संडासला साफ होते.

मग माझ्या डोक्यातला विचारांचा मार्ग मोकळा होतो.

मग मी बाहेर येवून घामाने ओथंबलेले विचार फॅनखाली सुकवत ठेवतो.

मग मी विचारांना घाम येईल इतकं संडासात बसायचं नाही असं ठरवतो.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी मातृदिनाबद्दल काय लिहुयाचा विचार करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी ह्याने हे लिहिल्याचं पाहतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी त्याने कविता लिहिल्याचं लाइकतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी एका कवीने आईवर जब्राट लिहिल्याचं पाहून गद्गदतो.

मग मला जगातल्या सगळ्याच आया थोर असल्याचं एका स्वामीने तिन्ही जगातल्या भिकार्‍यांना सांगितल्याचं आठवतं.

मग आपण काही लिहुयाच नकोवर शिक्कामोर्तब होतं.

मग माझ्या मेंदूतलं मॅजिक उचंबळून वर येतं.

 

मग बायको बोलत असते तिला मी नेमक्या जागी हूं हूं ने प्रतिसादतो.

मग बायको माझ्या प्रतिसादासाठी बोलायचं थांबवते आणि मी हूं हूं करतो.

मग आपण बायकोचं बोलणं ऐकलं नसल्याचं तिला कळून चुकल्याचं मला कळून चुकतं.

मग मी खजील चेहर्‍याने बायकोला माझ्या मेंदूतल्या मॅजिकची गोष्ट सांगतो.

मग केसांतून हात फिरवत बायको ‘तू असा कसा रेSS’ ने लाड करते.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

समझनेवालेकोइशाराकाफी भाषा

समझनेवालेकोइशाराकाफी भाषेत बोलतो मी

       मलासुद्धा आज
       दानधर्म करायची खुमखूमी आलीये
       दुपटीने देणाराय
       तुम्ही 1 भारतीय रूपया माझ्या बीटीसीअॅड्रेसवर पाठवा
       मी लगेच तुम्हाला 2 भारतीय रूपये परत करेन

       कोणीतरी माझा बीटीसीअॅड्रेस शेयर करा रे

       हॅशटॅगबीटीसीस्कॅम हॅशटॅगगेट्समस्कबेजोस

काय झाट समझलं नाय तुमाला

अॅलेक्सा डीयर
रशीदखानसाहेबांना काफी आळवायला लाव
त्यांच्या हातवाऱ्यावरून काय समजतं का बघूया

वेळ कमी आहे

वेळ कमी आहे
अनादिकाळापासून
अनंतकाळापर्यंत

वेळ कमी आहे
लवकरात लवकर ताण दिला पाहिजे
लवकरात लवकर सुचले पाहिजे
लवकरात लवकर लिहीले पाहिजे
लवकरात लवकर बोलले पाहिजे
लवकरात लवकर

लवकरात लवकर शोधतो
लवकरात लवकर उत्तरतो
लवकरात लवकर लाईक करतो
लवकरात लवकर मत व्यक्त करतो
लवकरात लवकर तटस्थ होतो
लवकरात लवकर बाजू घेतो
लवकरात लवकर न्याय करतो
लवकरात लवकर पाहतो
लवकरात लवकर वाचतो
लवकरात लवकर वाचल्याचं ओरडून सांगतो
लवकरात लवकर

लवकराचा स्पीड अजून वाढवला पाहिजे
लवकराला लवकराने गुणलं पाहिजे
लवकरापेक्षाही लवकर पापणी मिचकावली पाहिजे

लवकरापेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे आपल्यापाशी
आणि प्रतिमाघडण क्लिकेच्या आवाक्यात

निरुद्देशिका अपडेटेड

प्रिय प्रोफाइलधारकांनो,

 

वाचकांनो, न-वाचकांनो, वाचकासारखे दिसणाऱ्यांनो,

न-वाचकासारखे दिसणाऱ्यांनो, वाचनवेड्यांनो,

वाचून वाचल्यासारखे करणाऱ्यांनो, वाचून न

वाचल्यासारखे करणाऱ्यांनो, न वाचून न वाचल्यासारखे

करणाऱ्यांनो, न वाचून वाचल्यासारखे करणाऱ्यांनो,

 

वाचून लाईकणाऱ्यांनो, न वाचून

लाईकणाऱ्यांनो, वाचून न लाईकणाऱ्यांनो,

न वाचून न लाईकणाऱ्यांनो, वाचून कमेंटणाऱ्यांनो,

न वाचून कमेंटणाऱ्यांनो, वाचून न कमेंटणाऱ्यांनो,

न वाचून न कमेंटणाऱ्यांनो, शेयरणाऱ्यांनो, पोस्ट्णाऱ्यांनो,

रोज पोस्ट्णाऱ्यांनो, अधूनमधून पोस्ट्णाऱ्यांनो,

मनातल्या मनात पोस्ट्णाऱ्यांनो, न पोस्ट्णाऱ्यांनो,

 

अंगठा कापून देणाऱ्यांनो, अंगठ्याच्या बदल्यात

अंगठा देणाऱ्यांनो, अंगठा मिळेलच्या अपेक्षेने

अंगठा देणाऱ्यांनो, अंगुठाबाज भाटांनो, अंगुठाबाज

लाळघोटयांनो, अंगठा शाबूत ठेवलेल्यांनो,

 

सेल्फीबहाद्दरांनो, फोटोबहाद्दरांनो, पाउटबहाद्दरिंनो,

माहीतगार प्रोफाईलधारकांनो, भाष्यकार प्रोफाईलधारकांनो,

प्रतिक्रियाकार प्रोफाईलधारकांनो, विद्वान प्रोफाइलधारकांनो,

सर्वकाही माहीत असणाऱ्यांनो, सर्वकाही माहीत न असणाऱ्यांनो,

 

आपण जे नाहीहोत ते भासवणाऱ्यांनो, आपण जे आहोत ते

लपविणाऱ्यांनो, आपण जे आहोत ते असणाऱ्यांनो,

 

चोळया हातांनो, लाळ्या जिभांनो,

हॅशटॅगच्या वाहत्या प्रवाहात हात धुवून घेणाऱ्यांनो,

झाडतोड्या

सक्काळसक्काळी कावळा येऊन बसतो डोक्यावर
जणूकाही मी फांदीये झाडाची

कावकाव करतो कानात
जा ना तुझ्या रानात
माझं डोकं का खातोस

मी फांदी नाहीये
झाडतोड्या आहे
ज्याला तुझी गोष्ट ऐकू येत नसते

मी कधी स्पर्श केला नाही झाडाला

मी कधी स्पर्श केला नाही झाडाला.

कधी पाणी नाही घातलं बुडाशी.

कधी बघितलं नाही बारकाईने

की कसं एका बीमधून उगवून आलं रोप

आणि मुळावत गेलं घट्ट मातीत

आणि झेपावत गेलं आकाशात.

कधी कौतुक केलं नाही हिरव्या रंगाचं.

 

फॉरेस्ट ग्रीन उठून दिसेल भिंतीला,

बायको म्हणाली. तसं केलं.

आरामखुर्चीत बसून भर दुपारी

उन्हाची कल्पना करत भिंतीच्या सावलीत

गार बसलो.

दाह कमी नाही झाला.

तहानेने घसा कोरडा झाला.

आरोचं पाणी प्यायलो.

मी कधी पाण्याला स्पर्श नाही केला.