बऱ्याच दिवसांनी आज मी माझी विझवून ठेवलेली मेणबत्ती बाहेर काढली. ज्या कोनाड्यातून मेणबत्ती बाहेर काढली तिथे अलगद मेंदू ठेवून दिला. मेणबत्तीचा आणि मेंदूचा कधीच विशेष संबंध येत नाही. तुम्ही एकतर मेणबत्ती हातात धरता किंवा मेंदू कवटीत. दोघांपैकी एक. मग मी मेंदूकडे पाहिलं. मेंदूतील सर्व केंद्रे झोपलेली होती अर्थात.

मग मी रांगेत जाऊन उभा राहिलो. अनेकजण माझ्या आधीपासूनच मेणबत्ती पेटवली जाण्याची वाट बघत उभे होते. शांतता इतकी होती की कँमेऱ्याची क्लिक स्पष्टपणे ऐकू यावी. मेणबत्ती पेटवणारा एक व्यक्ती रांगेतील प्रत्येकाची मेणबत्ती पेटवत पेटवत माझ्या दिशेने जवळ येत होता. तो आणखी जवळ आला. त्याला अर्थातच चेहरा असण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. त्याच्या हातात बातमी होती तिच्याने तो मेणबत्ती पेटवत होता. आजुबाजूला काळोखच काळोख. फक्त मेणबत्तीचा उजेड.

तेवढ्याशा उजेडात तर आम्ही फक्त आमच्या समोरच्याचं अंधारानुकरणच करू शकत होतो. मेंदू नसल्याने अर्थातच आम्हाला काही दिसण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात आम्हाला समोरच्याची पाठ तेवढी दिसत होती तेवढ्या पुराव्याच्या आधारे आम्हाला पुढे पुढे चालायचं होतं. पुढे म्हणजे कुठे? कुठे म्हणजे पुढे? असा प्रश्न कदाचीत तुम्हाला पडला असेल. तो आम्हाला पडण्याचा काही प्रश्नच येत नाही.

आमच्या मेंदूतील प्रश्न निर्माण होणारी केंद्रं त्या बिनचेहऱ्याच्या मेणबत्ती पेटवणाऱ्या माणसाने कधीचीच बंद करून टाकलेली आहेत. आणि प्रश्न निर्माण होण्यासाठी मेंदूतील जी एनर्जी वापरली जाणार होती ती सारी एनर्जी मेंदूतल्या दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं जे केंद्रंय त्याठिकाणी एकवटण्यात आली होती. त्यामुळे दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं मेंदूतलं केंद्र अतिसंवेदनशील झालेलं होतं. त्यामुळे बिनचेहऱ्याच्या माणसाने त्याच्या हातातील बातमीने जरासं स्टिमुली दिलं की मेणबत्ती पेटावी तितक्या सहजतेने आमच्या मेंदूतलं दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं केंद्रं दुखावलं जातं. मग फेस्बुकावर आम्ही आमच्या मेंदूतल्या सर्व शहाणपणाचं खर्चीकरण करून मेंदूतली सर्व केंद्र झोपवून टाकतो व नेहमीप्रमाणे झोपलेला मेंदू कोनाड्यात सुरक्षित ठेवून हातात मेणबत्ती घेऊन रांगेत जाऊन उभे राहतो. या सर्व प्रक्रियेत मला सांगा की आम्हाला प्रश्न पडण्याचा प्रश्न येतो कुठे?

दरम्यान बिनचेहऱ्याचा माणूस ज्या बातमीने आमच्या हातातील मेणबत्ती पेटवत असतो त्या बातमीच्या आजूबाजूला आणखी अनेक बातम्या शिळ्या होत चाल्लेल्या असतात. त्याच्यात कोणीएक पानसरे मारला जाऊन कित्येक दिवस उलटून गेल्याची एक बातमी असते. बाजूलाच कोणी अविजीत रॉय मेंदूतल्या प्रश्न निर्माण होणाऱ्या केंद्रांना जिवंत ठेवण्याचं निरूपयोगी काम करत असल्याचा मोबदला म्हणून त्याच्या बायकोसमोर ठार मारला गेलेलासल्याची बातमी असते. जमिनीचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग राहिलेला नाहीवर शिक्कामोर्तब करणारा कायदा पास झाल्याची एक बातमी असते. मुख्य मथळ्याच्या ठिकाणी असलेली बजेटची निरर्थक आकडेवारी जिला कवटीत घुसण्यास काही फटच शिल्लक ठेवलेली नसते आम्ही ती दिमाखात झळकतसते. या सर्व बातम्यांच्या गदारोळातून बिनचेहऱ्याचा माणूस आमची मेणबत्ती पेटवू शकेल अशा बातमीने आमच्या हातातील मेणबत्ती पेटवत होता. आणि आम्ही त्या मिणमिणत्या उजेडात समोरच्याच्या पाठीकडे पाहत पुढेपुढे चाललो होतो. पुढे म्हणजे कुठे? कुठे म्हणजे पुढे?