मिथकमांजर : उपोद्घात

ही एक गोष्टय

मांजरीची

जिची कधी झाली सुरुवात

कधी होणार तिचा अंत

कोणालाच माहीत नसते

 

कोणी सांगितली ही गोष्ट पहिल्याप्रथम

कोणाला सांगितली गेली

याचा अतापता नसतो कोणालाच

 

सांगणारा पेरत जातो विश्वास

ऐकणार्‍याच्या मनात गोष्टीविषयी

पिढीदरपिढी जीवंत होत जाते गोष्ट

 

गोष्टीलाही खबर नसते कानोकान

की आपण आता एक

हाडामांसाचं जीवंत जनावर झालोय

जे आंजारूगोंजारू शकतं मायाळू

आणि नरडीचा घोटही घेवू शकतं वेळ पडली तर

 

ही एक गोष्टय

गोष्टीच्याही पलीकडे निघून गेलेली

 

 मिथकमांजर: एक

मांजर हरवली आहे.

मागील तीन दिवसांपासून मांजर हरवली आहे.

किंवा ती वर्षभरापासूनच कोणाला दिसलेली नाहीये

किंवा अनादीकाळापासून कोणी पाहिलेलं नाहीये तिला.

 

मागील तीन दिवसांपासून

किंवा वर्षभरापासून किंवा अनादीकाळापासून

माणूस तक्रार करतोय की मांजर हरवलीये

 

आणि आवंठा दाटून आलेलाय

तीन दिवसांपासून किंवा वर्षभरापासून किंवा अनादीकाळापासून

माणसाच्या घशात मांजर हरवल्यामूळे

 

मांजरीला कोणी पाहिलं शेवटचं?

तर असंख्य हात उतावीळपणे वर येतात.

प्रत्येकानेच जणूकाही कधी ना कधी पाहिलेलं आहे मांजरीला

 

कधी पाहिलं मांजरीला तुम्ही?

तर असंख्य आवाज खात्रीशीररीत्या ओरडतात

तीन दिवसांपूर्वी किंवा वर्षभरापूर्वी किंवा अनादीकाळाच्याहीपूर्वी

कशी होती तुम्ही पाहिलेली मांजर?

तर आता तुमच्या मेंदूत जी मांजर तुम्हाला दिसतेय

तसं तर कोणीच करत नाही तिचं वर्णन.

 

सर्वानुमते तिला जेव्हा शेवटचं पाहिलं

तेव्हा तिने आ वासलेला होता.

आणि ती तोंड बंद करू शकत नव्हती.

त्यानंतर तिला कोणीच पाहिलं नाही.

 

मांजर हरवली आहे.

तुम्ही तिला शेवटचं कधी पाहिलं?

 

मांजर हरवली तेव्हा काळोख होता काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा उजेड होता काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा जमिन दुभंगली काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा आकाशाचा पडदा टराटरा फाटला काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा रक्ताचा पाऊस मुसळधार कोसळला काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा दिवस ढसाढसा रडला काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा रात्रीने कपाळ बडवून घेतले काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा तीन दिवस झाडाचं पान हाललं नाही काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा विजेचा लोळ कोसळला पृथ्वीवर काहींच्या मते

मांजर हरवली तेव्हा लाव्ह्याने लपलप गिळलं होतं नव्हतं सारं काहींच्या मते

 

आ वासलेली आणि तोंड बंद न करू शकणारी मांजर

तुम्ही पाहिली असल्यास

कृपया 7757970117 या नंबरवर संपर्क करा.

 

तुमचा यथोचित सन्मान केला जाईल.

 

आ वासलेल्या आणि तोंड बंद न करू शकणाऱ्या मांजरीचा फोटो

डकवा कृपया आपल्या टाईमलाईनवर हॅशटॅगमिथकमांजर

 

आ वसलेल्या आणि तोंड बंद न करू शकणार्‍या मांजरीचं

लिहा अद्भुत चरित्र हातोहात बेस्टसेलर

 

आ वसलेल्या आणि तोंड बंद न करू शकणार्‍या

मांजरीच्या नावाने वाचा मिथकमांजरपंचेचाळिसा

ब्रम्हानंदी वाजेल तुमच्या मेंदूची टाळी

 

आ वासलेल्या आणि तोंड बंद न करू शकणाऱ्या

मांजरीचं तत्वद्न्यान तुम्हाला समजलं असल्यास

कृपया आ वासा आणि तोंड बंद करू नका

आ वासलेल्या आणि तोंड बंद न करू शकणाऱ्या

मांजरीचं मंदीर बांधायला तुम्हाला कोणी सांगीतलं?

 

मांजर कधीनाकधी हरवणारच होती.

मांजरीचं अंतीम डेस्टीनेशन हरवणं हेच असतं कायम.

तुमच्या अंगाखांद्याच्या घसरगुंडीवरून घसरणारच असते

ती कायम खोल ब्लॅखोलात

तुमचे कनवाळू पाय चाटता चाटता

चटकन होणार असते तिचं महानिर्वाण

तुमच्या मायाळू स्पर्शाला

मुकावंच लागणार होतं तिला कधीनाकधी

 

मांजरीला आणलं घरात पहिल्यांदा तेव्हा आई ओरडली

मुक्या जनावरांना जास्त लावू नये माया

 

मांजरीला माणसाळवलं तेव्हा खापरपणजोबा खेकसत म्हणले

स्वत:च स्वत:च्या पायावर का मारून घेतोयस मांजर

 

मांजरीला कवटाळलं तेव्हा डेंजर डॉन फादर डॉमनिकचे डोळे

जाड भिंगाच्या चष्म्याआडून अध्यात्माच्या सातव्या मजल्याला चिकटले

 

मांजरीच्या मिशाळ तोंडाचं चुंबन घेतलं तेव्हा

माझ्या नास्तिक बहिणीने वॅक्कण ओकारी टाकली बाहेर

 

मांजरीला छातीशी गोंजारलं तेव्हा

माझ्या अतिआस्तिक भावाने पितापुत्रआणिपवित्रआत्म्याच्या नावाने

परमेश्वराला मरेस्तोवर गुदगुल्या केल्या

 

मांजरीने लपालपा दूध प्यायलं आस्थेने तेव्हा

जगाने डोळे बंद करत लोटांगण घातलं मांजरीच्या पायथ्याशी

 

मांजर हरवली तेव्हा

मांजर कधीनाकधी हरवणारच होती

एवढं साधं सत्य मला आधीच का उमगलं नाही म्हणून

आ वासून तोंड बंद न करता बसून राहिलो मी दिवसभर

 

तीन दिवसांपासून हरवलेल्या

किंवा मागील वर्षभरापासून कोणीच न पाहिलेल्या

किंवा अनादिकाळापासून कोणालाच न दिसलेल्या

मांजरीचा सुळसुळाट आहे सर्वत्र

तिच्या शुभशकुनी शेपटीचं चूंबन घेऊनच

ओलांडावा लागतो उंबरा सर्वांना

 

तिच्या वासलेल्या आ मधून

कधीही पडू शकतो शब्द बाहेर

तो झेलण्यासाठी प्रत्येकाने पसरलेली असते

उतावीळ ओंजळ

 

प्रत्येकाला वाटते आपल्या घरात असावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या दिवानखान्यात सजलेली असावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या अंगणात पार्क केलेली असावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या दारावर मनोभावे टांगवलेली असावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या अंगाखांद्यावर खेळत असावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या गळ्यात उठून दिसावी मांजर

प्रत्येकाला वाटते आपल्या खिशात खुळखुळत असावी मांजर

 

प्रत्येकाला वाटते आपल्या मांजरीने एक मदमस्त जांभई द्यावी जिच्यातून बाहेर पडेल स्वर्गीय आलाप

प्रत्येकाला वाटते आपली मांजर ठॉक्कन पादावी ज्याच्याने पडेल पर्यावरणाला एक अंतिमाकडे जाणारं भोक

 

प्रत्येकाला वाटतं मांजरीवर लिहाव्यात आपण काव्यात्म ओळी

तिला कोळून प्यायची झाट कोणाची हिंमत नाही.

 

 

 

 

वाचकांसाठी सुचना

 

वाचकांनी कृपया लक्ष द्या

पाठक क्रीपया ध्यान दे

रीडर्स प्लीज पे अटेंशन

 

वाचकांसाठी एक आनंदाची बातमीये

या कवितेतील मांजर रीप्लेसेबल आहे.

 

तुम्ही सहजपणे या कवितेतील मांजरीला

मांजरीसारखं उचलून कवितेतून काढू शकता बाहेर

आणि तिच्या जागी ठेवू शकता तुमचा आवडता टॉमी

 

 

मीथकमांजर: दोन

 

१.

मांजर सापडली आहे.

नुकताच ब्रेकींग न्यूज आली आहे.

 

मांजर सापडली तेव्हा तिचं

हरवतानाचं आ वासलेलं तोंड आ वासलेलंच होतं.

प्रत्यक्षदर्शीने कथन केलं

 

शिवाय तिच्या मिशा हसत होत्या.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीने कथन केलं

 

शिवाय तिच्या डोळ्यांतून करुणा सांडत होती.

आणखी आणखी एका प्रत्यक्षदर्शीने कथन केलं

 

शिवाय तिच्या गळ्यात कोणीतरी सत्य बांधलेलं दिसून आलं होतं.

अजून एक प्रत्यक्षदर्शी

 

तिच्या गळ्यातलं सत्य घंटेसारखं वाजल्यानंच तिचा शोध लागला

असं वृत्तनिवेदिका ओठांच्या चंबूतून सांगत होती.

 

जगातल्या सर्व टिव्यांवर आता एकच एक्स्क्लूजीव ब्रेकींग न्यूज होती.

मांजर सापडली आहे.

 

जगात सर्वांचेच डोळे टिव्यांवर आतुरतेने खिळले गेले होते.

 

हरवून पुन्हा सापडलेल्या आणि आ वासलेल्या मांजरीच्या करूण डोळ्यांतून एक कटाक्ष सांडावा

आणि आपलं जीवन सार्थकी लागावं म्हणून प्रत्येकजण हपापलेला होता.

 

थोड्याच वेळात कॅमेरामन अमूकसोबत वार्ताहर तमूक घटनास्थळी पोहचणार होते.

 

मांजर सापडली आहे.

हरवलेली मांजर सापडली आहे.

आ वासलेली आणि हरवलेली मांजर

आ वासलेल्याच अवस्थेत सापडली आहे.

 

हा एक चमत्कार आहे.

जगाने आश्चर्याने आ वासलेला आहे

आणि आज स्टूडीयोमध्ये

आ वासलेले चार आणि

नखं कुरतडणारे चार चर्चक उपस्थित आहेत.

 

प्रथम आपण आ वासलेल्यांकडे वळू. तुमचं काय म्हणणं आहे?

 

आ वासलेला चर्चक एक: हा एक चमत्कार आहे. मांजर हरवली होती तेव्हाच ती सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आणि ज्या अर्थी मांजर हरवली आहे त्याअर्थी मांजर सापडणार आहे असं स्पष्ट भाकीत आपल्याच चॅनलवरून मी त्यावेळी नोंदवलं होतं.

 

आ वासलेला चर्चक दोन: इतकंच नाही! हरवताना मांजरीचा आ वासलेला असल्याने जेव्हा ती सापडेल तेव्हासुद्धा तिचा आ वासलेलाच असेल असं भाकीत मीदेखील आपल्याच चॅनलवरून त्यावेळी नोंदवलं होतं.

 

नखं कुरतडणारा चर्चक चार: अहो पण हरवताना मांजरीचा आ वासलेला होता याचा पूरावा काय? इतिहासात याची काहीच नोंद सापडत नाही.

 

आ वासलेला चर्चक दोन: हे बघा नखं कुरतडणारा चर्चक दोन, ह्या गोष्टी इतिहासात शोधायच्या नसतात. तुम्ही मिथकमांजर १ ही कविता नीट वाचा. त्या कवितेत आ वासलेली मांजर हरवली याबद्दलचा इतिवृत्तांत नोंदवण्यात आलाय.

 

ओठांच्या चंबूतून निवेदिका: नखं कुरतडणारा चर्चक चार तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका. आ वासलेला चर्चक चार यांनासुद्धा काही म्हणायचंय पण तत्पूर्वी मी आ वासलेला चर्चक तीन यांची प्रतिक्रीया जाणून घेऊ इच्छीते. काय आहे तुमची प्रतिक्रीया. आ वासलेला चर्चक तीन. तुमची प्रतिक्रीया काय? आ वासलेला चर्चक तीन तुमच्याशी आम्ही पुन्हा कनेक्ट होऊ तोवर आ वासलेला चर्चक चार आपलं मत मांडतील.

आ वासलेला चर्चक चार: आ वासलेल्या आणि हरवलेल्या आणि पुन्हा सापडलेल्या मांजरीच्या गळ्यात आता सत्य बांधलेलं असल्याची माहिती मिळालेली आहे आणि हे शुभ संकेत आहेत. मला त्यावेळी सुद्धा खात्री होती की ज्याअर्थी मांजर हरवली आहे त्याअर्थी काहितरी खास प्रयोजन त्यामागे असलं पाहिजे. मांजरीच्या गळ्यात सत्य बांधलं गेल्याची माहिती आता मिळतेय म्हणजेच आता तिच्या हरवण्याबाबतचा स्पष्ट उलगडा झालेला आहे.  ती हरवली तीच मूळात सत्य गळ्यात बांधून घेण्यासाठी असं माझं ठाम मत आहे. आणि आता यापूढे आपण मांजर हरवली होती असं नं म्हणता ती अंतर्धान पावली होती आणि ती पुन्हा प्रकट झाली असं म्हणायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे.

 

नखं कुरतडणारा चर्चक एक: परंतु माझं असं म्हणणं आहे की मांजर मूळात हरवली नव्हतीच. तिला गायब केलं गेलं होतं. तिच्या गळ्यात बांधलं गेलेलं सत्य हे सत्य नाहिये. सत्य आणखीही काही असण्याची शक्यता आहे. केवळ मांजरीच्या गळ्यातलं सत्य सातत्याने घणघण वाजतेय म्हणून त्याला सत्य म्हणण्याची काहिच गरज नाहिये. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे तपासणी केली जाणं गरजेचं आहे.

 

नखं कुरतडणारा चर्चक तीन: होय मी नखं कुरतडणारा चर्चक एकच्या मताशी पुर्णत: सहमती दर्शवतो. जर सत्यशोधन समितीने पूर्णत: निष्पक्ष चौकशी करून मांजरीच्या गळ्यात बांधलेली घंटा ही घंटा नसून सत्य आहे असा अहवाल सादर केला तर आणि तरच मी मानेन की मांजरीच्या गळ्यात बांधली गेलेली घंटा ही घंटा नसून ते सत्य आहे.

नखं कुरतडणारा चर्चक दोन: मांजर नेमकी कधी हरवली होती याचीदेखील चौकशी करा अशी मागणी मी मांजर हरवली त्या दिवसापासून करत आलेलो आहे. तिच्या हरवण्याबाबतच आमच्या मनात काही शंका आहेत त्या आम्ही वेळोवेळी व्यक्तदेखील केल्या होत्या.

 

नखं कुरतडणारा चर्चक चार: मांजरीच्या म्हणजेच मुक्या जनावराच्या गळ्यात अशाप्रकारे सत्य बांधून मांजरीवर म्हणजेच मुक्या जनावरावर अत्याचार करण्यात आल्याबद्दल आम्ही आंतरराष्ट्रीय मुकी जनावरं हक्क आयोगाकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.

 

ओठांच्या चंबूतून निवेदिका: तुमचं नेमकं म्हणणं काय आहे? तुमची तक्रार कशाबद्दल आहे? आणि सर्वात आक्षेपार्ह म्हणजे ज्या मांजरीच्या गळ्यात सत्य बांधलं गेलंय त्या मांजरीचा उल्लेख तुम्ही सतत मुकं जनावर असं का करताय? आ वासलेला चर्चक एक, नखं कुरतडणाऱ्या चर्चक चारने जिच्या गळ्यात सत्य बांधण्यात आलं आहे अशा मांजरीचा मुकं जनावर असा अपमानास्पद उल्लेख केलेला आहे तुमचं काय म्हणणं आहे. तुमची संघटना या मुद्द्यावरून आंदोलन करणार का?

 

नखं कुरतडणारा चर्चक चार: यात अपमानास्पद असं काहीच नाहीये उलट आम्ही मुक्या जनावरांच्या म्हणजेच जिच्या गळ्यात सत्य बांधण्यात आलंय त्या मांजरीच्या बाजूने…

 

ओठांच्या चंबूतून निवेदिका: हे बघा याचं उत्तर आ वासलेला चर्चक एक देईल. तुम्ही माझ्या चॅनलवर असे मध्येमध्ये बोलू शकत नाही.

 

आ वासलेला चर्चक एक: हे बघा जिच्या गळ्यात साक्षात सत्य बांधलं गेलंय त्या मांजरीचा असा अवमानास्पद उल्लेख केला गेल्याबद्दल आम्ही शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने आणि बापूंच्या मार्गाने अशा तिन्ही मार्गांनी आंदोलन करून निषेध करणार आहोत.

 

ओठांच्या चंबूतून निवेदीका: मी तुमच्या भावना समजू शकते. नखं कुरतडणारा चर्चक चार तुमच्या तक्रारीचं नेमकं स्वरूप काय आहे? काय आहे तुमचं नेमकं म्हणणं?

 

नखं कुरतडणारा चर्चक चार: हे बघा, आपल्याला जे सत्य वाटतंय ते मूक्या जनावरांच्या लेखी केवळ एक क्षुल्लक घंटा असू शकते. आपण आपली घंटा अशी मूक्या जनावरांवर थोपू शकत नाही.

 

आ वासलेला चर्चक दोन: हे बघा नखं कुरतडणारा चर्चक चार. तुम्ही वारंवार आ वासलेल्या आणि हरवलेल्या आणि पुन्हा सापडलेल्या आणि जिच्या साक्षात गळ्यात सत्य बांधलेलं आहे अशा मांजरीचा उल्लेख मुकं जनावर असं करून जाणीवपूर्वक आमच्या भावनांना ठेच पोचवताय. याचे परिणाम फार वाईट होतील.

 

नखं कुरतडणारा चर्चक एक: हे बघा, मुक्या जनावरांना मुकं म्हटल्याने तुमच्या भावना दूखावल्या जात असतील तर तुमच्या भावनांना आवर घाला. मी पुन्हा एकदा प्रतिपादन करतो की आ वासलेली मांजर हरवलीच कशी याची चौकशी व्हावी

 

ओठांच्या चंबूतून निवेदिका: तर प्रेक्षकहो, तुम्ही पाहताय की आ वासलेली आणि हरवलेली मांजर सापडल्यानंतर खूप गदारोळ माजलाय. आ वासलेल्या लोकांचं म्हणणंय की आ वासलेल्या आणि हरवलेल्या मांजरीच्या गळ्यात सत्य बांधलेलं असणं हे शुभसंकेत आहेत आणि या घटनेचं आपण स्वागत करायला पाहिजे. तर त्याचवेळी या गोष्टीला विरोध करणाऱ्या नखं कुरतडणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्यात यावी. दरम्यान या महत्वाच्या चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेले परंतु तांत्रिक कारणांमुळे ज्यांच्याशी आपल्याला कनेक्ट होता आले नाही त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींचा संपर्क झाला असता त्यांनी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली की आ वासलेल्या आणि हरवून पुन्हा सापडलेल्या, आणि जिच्या साक्षात गळ्यात सत्य बांधलेलं आहे त्या मांजरीच्या मंदिरनिर्माणाचं पवित्र कार्य हाती घेण्यात आलंय. आ वासलेले चर्चक तीन त्यामुळेच आपल्याशी कनेक्ट होवू शकले नाहीत. तर ही महत्वपूर्ण चर्चा अशीच सुरू राहील. भेटूया ब्रेकनंतर. पाहत रहा कदीबी माझाच.

 

 

 

मांजर सापडली आहे.

मांजर केवळ सापडलीच नाही तर तिच्या साक्षात गळ्यात

सत्य देखील बांधलेलं होतं

 

काल रात्री याच सत्याचा निनाद काही जणांनी ऐकला.

आणि सकाळी काही जणांना इथे याच ठिकाणी

मांजरीच्या पावलाचे ठसे आढळून आले.

 

 

ज्याअर्थी मांजरीच्या पावलाचे ठसेदेखील आहेत

आणि ज्याअर्थी रात्री सत्याचा निनाददेखील ऐकू आला होता त्याअर्थी

मांजर सापडली आहे.

 

 

शिवाय सापडलेली मांजर कोणी पाहिली का?

तर अनेक हात वर आले.

 

त्या वर आलेल्या प्रत्येक हाताच्या मेंदूत मांजर दिसून येत होती.

त्या प्रत्येक मांजरीचा आ वासलेला होता.

 

 

आता तुमच्याही मेंदूत तुम्हीच पाहा

पाहा मांजरीचा आ वासलेला आहे की नाही

 

 

त्याअर्थी मांजर सापडली आहे.

 

कुठे पाहिली?

तर वर आलेले सर्व हात जमेल त्या दिशेला वळले

 

म्हणजेच सापडलेली मांजर चराचरात होती हेच यातून सिद्ध झालं.

 

 

मांजरीचा रंग?

 

काळोख्या खोलीत काळ्या मांजरीचा रंग काय असा प्रश्न उपस्थित करून मांजरीच्या अस्तित्वविषयक संभ्रम निर्माण होईल असा प्रश्न निर्माण करणे हे किमान ज्या दिवशी हरवलेली मांजर सापडली त्या दिवशी तरी शोभून दिसत नाही. त्यामुळे हा प्रश्न आपण उद्या विचारात घेणार आहोत.

 

मांजरीचा आकार?

 

म्हणजे चार नाजूक पाय? होते

 

दोन चाणाक्ष डोळे? होते

 

दोन इवलेशे कान? होते

 

साताठ मुलायम मिशा? होत्या

 

शिवाय गळ्यात सत्य बांधलेलं? होतं

 

झालं तर मग. मांजर सापडली आहे.

 

आ वासलेली आणि हरवलेली आणि जिच्या साक्षात गळ्यात सत्य बांधलेलं आहे अशी मांजर सापडली आहे.

 

तर झालं असं…

 

आकाश चांदण्यांनी चमचमत होतं.

संपूर्ण आकाशात एकमेव ढग तरंगत होता.

 

मी तो ढग पाहिला मात्र आणि

मांजरीची तीव्र उबळ माझ्या आत दाटून आली.

 

मेंदूत मांजर थयथय नाचू लागली.

आ वासलेला असल्याने ती मॅव करू शकत नव्हती

 

मी आकाशाकडे पाहिले

आ वासला

घशात मांजर दाटून आली

ढग मांजरीसारखा होता.

 

अगदी तीच तशीच मांजर

आ वासलेली आणि तोंड बंद न करू शकणारी

अगदी तशीच

गळ्यात सत्य बांधलेली

अगदी तशीच

सर्वांना हवीहवीशी

अगदी तशीच

जशी आता तुमच्या मेंदूत आहे.

मी मांजरीच्या आकाराच्या ढगाकडे

भक्तीभावाने बघितलं.

भक्तीभावाने बघताबरोबर

मांजरीच्या आकाराच्या ढगाच्या ढगाळ गळ्यातील

घंटेचा निनाद निनादला.

 

हाच तो आवाज.

हाच तो स्वर

हाच तो शब्द

हेच ते अस्तित्व

 

सत्य सापडलं.

 

नंतर काय झालं?

 

नंतर?

 

वाऱ्यासारखी वायरल झालेली

बातमी माझ्या कानावर आली.

 

मांजर सापडली आहे.

आ वासलेली आणि तोंड बंद न करू शकणारी

आणि हरवलेली मांजर सापडली आहे.

 

तर हा होता मांजर सापडण्याच्या

आदल्या रात्री घडून आलेला अभूतपूर्व दृष्टांत.

 

 

(आ वासलेल्या मांजरीच्या दंतकथा – १)

दुष्काळ होता

किंवा पुरस्थिती

किंवा धूमकेतू कोसळला होता

किंवा चाळीस दिवस आणि चाळीस रात्र

कंटिन्यू पाऊस होता मुसळधार

 

जनजीवन विस्कळीत होतं

लोक भुकेले होते

चोर्‍यामार्‍या वाढलेल्या होत्या

लूट लुबाडणूक वाढली होती

सारं जग दलदलीत अडकलेलं होतं

 

अशा अवकाळी अवतरली होती मांजर

आ वसलेला नव्हता तिचा

ती अवतरली तेव्हा

 

जपमाळ होती तिच्या हातात

डोळे अर्धोन्मिलित

ध्यानमग्न होती मांजर

ती भानावर आली तेव्हा

तिचा आ वासलेला होता

 

तेव्हापासून आजवर दुष्काळाने

गावाचं तोंड पाहिलेलं नाहीये

 

(आ वासलेल्या  मांजरीच्या दंतकथा – २)

कडेकपरीतला एकाकी गाव

गावाच्याबाहेर असलेली एकमेव टेकडी

त्या टेकडीवरील एकमेवाद्वितीय पडकं देऊळ

 

देवळाच्या पायथ्याशी भुकेने व्याकूळ रडणारी पोरं

पाहवली नाहीत पडक्या देवळाला

 

एके दिवशी भल्या पहाटे

एक स्वर्गीय मांजर टेकडीवरून खाली उतरली

 

गावाच्या मध्यभागी असलेल्या एका झोपडीत घुसली

आणि रिकाम्या वाटीत तोंड खुपसलं

 

डोळे बंद करून मांजर

रिकाम्या वाटीतून जणूकाही दूध पित होती आणि

गावकरी पाहत होते

 

मांजरीने वाटीतून तोंड बाहेर काढले

तेव्हा तिचा आ वासलेला होता आणि मिशांना दुधाचे थेंब

होते चिकटलेले

 

मांजर आली त्याच दिशेने निघून गेली पुन्हा

टेकडीवरील देवळाच्या दिशेने

 

त्या दिवसापासून आजवर गावात

दुधाच्या नद्या वाहताहेत

 

मांजरीला शिंगं नसतात

आ वासलेल्या मांजरीला शिंगं नव्हती

 

आ वासलेल्या आणि हरवलेल्या आणि

पुन्हा सापडलेल्या मांजरीच्या डोक्यावर शिंगं नव्हती

 

तिच्या डोक्यावर

शिंग असू शकलं असतं अशा जागी

होता एक झेंडा

 

नुकताच उगवून आलेला

पण मूळं मेंदूत खोलवर रूतलेला झेंडा

 

झेंड्याला रंग होता

तुमच्या मेंदूत आता जो आहे तोच

 

झेंड्याला आकार होता

तुमच्या मेंदूत आता जो आहे तोच

 

झेंड्याला आवाज होता

तुमच्या मेंदूतल्या फडफडीला असतो तसाच

 

झेंड्याला गोष्ट होती

झेंड्याला इतिहास होता

झेंड्याला भुगोल होता

झेंड्याचं आपलं एक गणित होतं

 

शिंगापेक्षा टोकदार होता झेंडा आणि गुळगुळीत

आणि धारदार आणि बोधट वेळप्रसंगी

आणि ताठर आणि लवचीक वेळप्रसंगी

आणि तिखट आणि मधाळ वेळप्रसंगी

 

रसाळ होती झेंड्याची वाणी

आणि आग ओकणारी वेळप्रसंगी

इन्विजीबल होता झेंडा

मांजरीच्या डोक्यावर

आणि वेळ पडल्यास प्रकट होणारा

झेंडा

 

मांजरीच्या डोक्यावरचा हाच झेंडा पाहून

ढेकर देत होते लोक

मांजरीच्या डोक्यावरचा हाच झेंडा पाहून

पोटावर हात फिरवत होते लोक

मांजरीच्या डोक्यावरचा हाच झेंडा पाहून

लोकांच्या डोक्यातला समाधानाचा किडा

तंगडी लांब करून मेंदूवर पसरत होता सर्वव्यापी

 

आ वासलेल्या आणि हरवलेल्या

आणि पुन्हा सापडलेल्या मांजरीला

शिंगं नव्हती, होता एक झेंडा

 

नुकताच उगवून आलेला

आणि मुळं मेंदूत खोलवर रूतलेला

मुळतत्ववादी झेंडा.

 

 

झेंड्याला कोणता रंग असावा

हा काही वादाचा विषयच नव्हता

 

रंग कोणताही असला तरी चालेल असंच सर्वांचं मत आहे.

 

तरी प्रत्यक्षदर्शींनी मांजरीच्या डोक्यावर

कोणत्या रंगाचा झेंडा पाहिला हे महत्त्वाचं होतं

 

एक प्रत्यक्षदर्शी – करड्या रंगाचा होता झेंडा.

मी मांजरीला पाहिले तेव्हा सकाळची किरणे पृथ्वीवर पोहचायची होती.

 

दोन प्रत्यक्षदर्शी – करडा रंग असू शकत नाही. करडा रंग असता तर झेंडा इतका उठूनच दिसला नसता. माझ्यामते तो सोनेरी रंग असावा. मी संध्याकाळ उलटून गेल्यावर पाहिलं होतं मांजरीला.

 

तीन प्रत्यक्षदर्शी – मला रंगांचं एवढं कळत नाही. पण हरवलेल्या आणि हरवून पुन्हा सापडलेल्या मांजरीचा  रंग पाहताबरोबर मला स्फुरण चढल्याचं पुसटसं आठवतंय.

 

स्फुरण या शब्दापाठोपाठ असंख्य चीत्कार ऐकू आले.

स्फुरण या शब्दापाठोपाठ असंख्य घोषनिनाद ऐकू आले

स्फुरण या शब्दापाठोपाठ असंख्य किंकाळ्या ऐकू आल्या

 

स्फुरण या शब्दाभोवती गाणं रचलं गेलं

समूहाने गाणं गायला सुरुवात केली

 

आ वासलेल्या आणि हरवलेल्या आणि पुन्हा सापडलेल्या

मांजरीच्या डोक्यावर उगवून आलेल्या झेंड्याला अर्थ प्राप्त झाला

झेंड्याच्या रंगाला अर्थ प्राप्त झाला

 

अर्थातून आणखी एक अर्थ बाहेर पडला

बाहेर पडलेल्या अर्थातून आणखी एक अर्थ बाहेर पडला

अनेक अर्थ बाहेर पडलेल्या अर्थातून बाहेर पडू लागले.

 

एक वेळ अशी आली की

एकावेळी साधारण साडेसातशे कोटी अर्थ बाहेर पडू लागले

आणि सर्ववेळी गुणिले साडेसातशे कोटी इतकी अर्थांची संख्या झाली

 

झेंड्याचा रंग कोणता असावा

मतभेद ह्यावरून कधीच नव्हते

 

मांजर हरवण्याआधी काहीच नव्हतं.

काहीच नव्हतंमधून मांजर निर्माण झाली.

 

मग मांजरीच्या जांभईतून हे विश्व

मग हे विश्व पसरू लागलं

पुढचं सगळं तुम्हाला माहीती आहे.

 

तुम्हाला जे माहीती नाही ते हे की

आपण सर्व मिथकमांजरीच्या जगड़व्याळ

कंटाळ्याची लेकरे आहोत.

 

 

मिथकमांजर: उपसंहार

तर प्रिय वाचकहो,

तुमच्या मेंदूत आतापर्यंत

घट्ट जाळं विणलेलंचंय

डेंड्राईटचं, मिथकमांजरीने

हे तुम्हाला कळून चूकलं असेलंच

 

आणि तुमच्या मेंदूचा

आकारदेखील मिथकमांजरीच्या

आकारासारखाच हुबेहूब एव्हाना

झालाच असेल शतप्रतीशत

 

आता तुम्ही केलीत खांडोळी

तुमच्या मेंदूची तरी त्यातून

बाहेर पडेल रक्त

मिथकमांजरीचं

किंवा वाईस वर्सा