संवेदनशीलता थुई थुई नाचू लागल्याचं पाहून

लापता मुलाचा असतो फोटो

माहिती सापडल्यास

कळविण्यासाठी फोन नंबर

तुमचा फक्त एक सेकंद खर्च होईलच्या

व्यावहारिक तसल्लीसह

पोस्ट शेयर करण्याची विनंती

मी फोटो पाहत नाही

शेयर करत नाही

लापता मुलाचं नावही पाहत नाही

 

पुढे स्क्रोलतो दहा सेकंदांपर्यंत

एक मुलगी असते आजारी

आपला एक शेयर किंवा लाईक

तिच्या उपचारासाठी एक रुपया मिळवून देणार असतो

१.२ मिलियन लाईक्स

जवळपास तितकेच शेयर्स

मी गुणिले १ रुपया करतो

आपल्या एका लाईकने

पडणार नाही झाटभरही भर

तिच्या मदतीतच्या गणितासह

स्क्रोलतो आणखी डीप

तिथे चेंजडॉटओआरजी मधलं

एक पिटिशन असतं

त्यावर आपण साईन केल्यास

गवरमेंट एखादी योजना

चालू किंवा बंद करण्याची शक्यता असते

त्यात आपला फायदा किंवा तोटा

लक्षात घेण्याआधीच मी स्क्रोलतो आणखी खोलवर

तिथे एका बलात्कार पीडितेने

बलात्कार करणार्‍याचं लिंग

छाटून टाकल्याची बातमी शेयर करतो

व BRAVO लिहितालिहिता

लिंग जागेवर असल्याची खात्री चाचपतो

 

तिथून आणखी जरा खोलवर

सानिया मिर्झाचे अकरा सखोल फोटो पाहून

मी हादरून जाण्याची शक्यता

वर्तवलेली असते एबीपीमाझाने

आपल्या हादरून जाण्याच्या शक्यतेने

माझी हातभर फाटल्याचं निमित्त करून

मी अकराचेअकरा फोटो पाहून घेतो सुमडीत

नेमकी तेव्हा माझ्या मेंदूतली संवेदनशीलता

थुई-थुई नाचू लागल्याचं पाहतो

आणि मुळापासून हादरून जातो

मी नर्सिसिस्ट थोडाचे

हा मीये

हे माझे प्रोफाईले

हा माझा फोटो

हा लहानपणीचा

हा शाळेत जायला लागल्यानंतरचा

हा कॉलेजला

हा पयल्या गलफ्रेंडसोबतचा शारूक

हा तिने दगा दिल्यानंतरचा देवदास

हा मित्रांबरोबर सन्मानमध्ये फुल्टुफटाक

हा लग्नाच्यावेळचा

हा बायकोसोबत हनिमुन स्पेशल

हा पहिला सेल्फी

हा दुसरा

हा शंभरावा

हा हसतानाचा

हा रडतानाचा

हा घाईघाईत सुलभ शौचालयासमोरचा

हगतानाचा नाहीये माझ्याकडे

मी नर्सिसिस्ट थोडाचे

मेंदूतलं मॅजिक

सांगितल्याप्रमाणे मग मी स्क्रोल डाऊन करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोवर क्लिक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोखाली लाईक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी कमेंटमध्ये एटीएट लिहितो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोतलं मॅजिक पाहतो.

मग हे सगळं मी नसतं केलं तरी चाल्ल अस्त असं वाट्ट.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी अपडेट अॅपचं बटन दाबतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी स्पेस रिकामी करण्यासाठी डेटा डिलिट करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी डोकं रिकामी करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी नव्याने डोकं भरून टाकतो.

मग मी आतल्या आत नव्याने भरलेलं डोकं कौतुके पाहतो.

मग माझ्या डोक्यातलं कौतुक आटत जातं.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी लॉगावूट होतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी दोन्ही हात पोटावर ठेवून पोटाला रेकी देतो.

सांगितल्याप्रमाणे मग मला संडासला साफ होते.

मग माझ्या डोक्यातला विचारांचा मार्ग मोकळा होतो.

मग मी बाहेर येवून घामाने ओथंबलेले विचार फॅनखाली सुकवत ठेवतो.

मग मी विचारांना घाम येईल इतकं संडासात बसायचं नाही असं ठरवतो.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी मातृदिनाबद्दल काय लिहुयाचा विचार करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी ह्याने हे लिहिल्याचं पाहतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी त्याने कविता लिहिल्याचं लाइकतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी एका कवीने आईवर जब्राट लिहिल्याचं पाहून गद्गदतो.

मग मला जगातल्या सगळ्याच आया थोर असल्याचं एका स्वामीने तिन्ही जगातल्या भिकार्‍यांना सांगितल्याचं आठवतं.

मग आपण काही लिहुयाच नकोवर शिक्कामोर्तब होतं.

मग माझ्या मेंदूतलं मॅजिक उचंबळून वर येतं.

 

मग बायको बोलत असते तिला मी नेमक्या जागी हूं हूं ने प्रतिसादतो.

मग बायको माझ्या प्रतिसादासाठी बोलायचं थांबवते आणि मी हूं हूं करतो.

मग आपण बायकोचं बोलणं ऐकलं नसल्याचं तिला कळून चुकल्याचं मला कळून चुकतं.

मग मी खजील चेहर्‍याने बायकोला माझ्या मेंदूतल्या मॅजिकची गोष्ट सांगतो.

मग केसांतून हात फिरवत बायको ‘तू असा कसा रेSS’ ने लाड करते.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

समझनेवालेकोइशाराकाफी भाषा

समझनेवालेकोइशाराकाफी भाषेत बोलतो मी

       मलासुद्धा आज
       दानधर्म करायची खुमखूमी आलीये
       दुपटीने देणाराय
       तुम्ही 1 भारतीय रूपया माझ्या बीटीसीअॅड्रेसवर पाठवा
       मी लगेच तुम्हाला 2 भारतीय रूपये परत करेन

       कोणीतरी माझा बीटीसीअॅड्रेस शेयर करा रे

       हॅशटॅगबीटीसीस्कॅम हॅशटॅगगेट्समस्कबेजोस

काय झाट समझलं नाय तुमाला

अॅलेक्सा डीयर
रशीदखानसाहेबांना काफी आळवायला लाव
त्यांच्या हातवाऱ्यावरून काय समजतं का बघूया

वेळ कमी आहे

वेळ कमी आहे
अनादिकाळापासून
अनंतकाळापर्यंत

वेळ कमी आहे
लवकरात लवकर ताण दिला पाहिजे
लवकरात लवकर सुचले पाहिजे
लवकरात लवकर लिहीले पाहिजे
लवकरात लवकर बोलले पाहिजे
लवकरात लवकर

लवकरात लवकर शोधतो
लवकरात लवकर उत्तरतो
लवकरात लवकर लाईक करतो
लवकरात लवकर मत व्यक्त करतो
लवकरात लवकर तटस्थ होतो
लवकरात लवकर बाजू घेतो
लवकरात लवकर न्याय करतो
लवकरात लवकर पाहतो
लवकरात लवकर वाचतो
लवकरात लवकर वाचल्याचं ओरडून सांगतो
लवकरात लवकर

लवकराचा स्पीड अजून वाढवला पाहिजे
लवकराला लवकराने गुणलं पाहिजे
लवकरापेक्षाही लवकर पापणी मिचकावली पाहिजे

लवकरापेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे आपल्यापाशी
आणि प्रतिमाघडण क्लिकेच्या आवाक्यात