खिडकीच्या चौकटीएवढं निव्वळ धुकं

खिडकी असण्याची जवळपास

शक्यता असणार्‍या या चौकटीतून

मी पाहतोय बाहेरच्या शक्यतेत

 

बाहेरच्या शक्यतेत मी पाहतोय

आकाश असण्याची जवळपास

शक्यता असणा­र्‍या आकाशाच्या दिशेने

मला जो दिसतोय

कदाचित निळा रंग

ढग असण्याची शक्यता असणा­र्‍या

पांढ­या पुंजक्यांच्या मागे

तोच आहे का आकाशाचा रंग

मला जे दिसतेय

कदाचित घुमटासारखे गोल छत

क्षितीज असण्याच्या दाट शक्यतेपर्यंत

खोलवर उतरलेलं

तसाच्च्या तस्सा आहे का आकार आकाशाचा

हे जे चार आकडयांचे कदाचित पक्षी

उंडारताहेत पंख पसरून

तीच आहे का आकाशाची अथांगता

चांदणे असण्याची दाट शक्यता

असलेले हे अगणित शब्द कुजबुजताहेत

तोच आहे का नेमका

माझ्या आकाशाचा अर्थ

 

समोरच्या खिडकीतून पाहणा­र्‍याला

मी विचारला आकाशाचा अर्थ

तर तो म्हणाला

खिडकी असण्याची शक्यता असणार्‍या

चौकटीएवढं निव्वळ धुकं

इतकं शांत तर

इतकं शांत तर तुला कधीच वाटलं नसेल

इतकं शांत की
तुझ्या उजव्या खांद्यावर बसून
एखादी चिमुकली चिमणी
तुझ्या सर्वज्ञ कानात कुजबूजू शकते

मी पाहू शकतो तुझ्या चेहऱ्यावर आनंद
की तू आहेस
आणि तुझ्या अवतीभोवती चिमण्या

चिमण्या करत नाहीत भांडवल
तुझ्या हातात ठोकलेल्या खिळ्यांचं
तुझ्या रक्तामांसाशी त्यांना
करायचा नसतो कोणताच देवघेवीचा करार
तु देवाचा पुत्रयस
की माणसाचा की कुमारिकेचा की विवाहीतेचा
या गोष्टींचा चिखल चिवडत नसतात चिमण्या
चिमण्या मूकाटपणे मेटिंगरत होतात
तुझ्या डोक्यावरील ध्यानस्थ मुकूटावर
तुझ्याशी असलंच तर चिमण्यांचं
इतकंच जैविक नातं असतं

चिमण्या चिवचिवतात
त्याची प्रार्थना होते

तुझ्या लाकडी पापण्या ओलावतात

तुझे लाकडी ओठ कुजबुजतात
प्रभो, दया कर
आणि हा प्याला माझ्यापासून कधीच हिरावून घेऊ नकोस.

कुल्फीवाला वितळला तो उष्ण दिवस

दुपारला बांधलेली आहे

घट्ट घंटी

जी टणटणटण करत

जागवतेय घशाखालची तहान

 

सकाळपासून खिशात

गरम झालेल्या रूपयाच्या बदल्यात

थंड होतोय घसा

 

कुल्फीवाल्याबरोबर घासाघीस करत

मी आठाण्यापर्यंत वितळवतो कुल्फीची किंमत

 

कुल्फीवाला तरीही

हसतो मिशीत मलूल

आणि टणटणटण निघून जातो

 

माझ्या घशात

बर्फ गोठून येतो

 

 

मेंदूतली घंटा वाजते

बायको म्हणते

आज मुलीला घेऊन जाऊ नॅचरल्समध्ये

विकेंडचा शेवट व्हावा गोड म्हणून

 

नॅचरल्सच्या काऊंटरवर

रात्री नऊ वाजता

आइस्क्रिममध्ये गोठलेला निसर्ग

आम्हाला साक्षात सामोरा येतो.

 

मुलगी तिला हवा असलेला

निसर्ग निवडते कपभर

 

हुबेहूब निसर्गाचा फ्लेवर

बायको म्हणते

 

मी मेंदूतली घंटा टणटणटण वाजवत

घशातली तहान जागवतोय आटोकाट

 

आता दिवस आहे

की रात्र

आता ऊन कोसळतंय

की बर्फ

आता घाम ओघळतोय

की कुडकुड वाजतेय हाडात

 

की टणटणटण घंटा

दुपारला बांधलेली

जी वितळवायची

माझ्या घशातली तहान

 

माझ्या मेंदूतला वितळत चाल्लाय

कुल्फीवाला

 

जरा एसी कम कर लेना भाई

बहोत ठंड लग रही है

निर्वाणीची प्रार्थना २

सिस्टर

हसते तेव्हा

ओसंडून वाहते तिच्या डोळ्यांतून

अध्यात्म

जे ती स्वत: पाहू शकत नाही.

 

साठेक वर्षे लागतात

क्रुसाच्या लांबलचक पसरलेल्या सावलीच्या

टोकाशी पोहचण्यासाठी.

 

क्रुसाला स्पर्श करण्यासाठी

अजून क्रुसाच्या लांबलचक सावलीइतकं

अंतर बाकी असतं.

 

सिस्टर

व्हिलचेअरवर बसून

खिडकीच्या गजातून न्याहाळत असते

अतिपवित्र क्रुसाची सावली

आणि हसते

कदाचित

क्रुसाच्या सावलीचं अध्यात्म

तिला कळलं असावं

जे क्रुसाच्या सावलीला दिसत नाही.

 

सिस्टर

हसते तेव्हा

क्रुसाच्या उजव्या खांद्यावर

लटकलेला असतो संध्याकाळचा सुर्य

 

कॉन्वेंटच्या पायरीशी

वाजतात सुकुमार पावलं

येशूच्या शोधात अालेली कधीकाळी

 

येशूचा शोध : प्रकाश

येशूचा शोध : मूक्ती

येशूचा शोध : तारण

 

आता पावलं थिजलेली

व्हिलचेअरवर

 

येशूचा शोध: व्हिलचेअर

येशूचा शोध: व्हिलचेअर

येशूचा शोध: व्हिलचेअर

 

आणि खिडकीचे गज

 

सिस्टर हसते

तेव्हा संध्याकाळचा सूर्य

क्रुसाच्या उजव्या खांद्यावरून

थोडा खाली सरकलेला असतो.

 

सिस्टर हसते

हातातल्या रोजरीचा एक मणी

पुढे सरकवते.

 

पिता

पुत्र

आणि पवित्र आत्म्याच्या नावे

एका लांबलचक दिवसाला

क्रुसाच्या पलिकडे ढकलते

 

हे प्रभोSSS

दया कर

आणि शक्य असेल तर

क्रुसाची सावली छाटून टाक

क्रुसाच्या मुळापासून

निर्वाणीची प्रार्थना १

१.

फादर

रस्त्याच्या मधोमध उभाये

उजवीकडे पाहत

डावा हात अर्धवट वर उचललेला

बहुतेक ते

जाणार्‍यायेणार्‍यांना मार्ग दाखवत असावेत

किंवा सत्य किंवा जीवन

 

किंवा लिफ्ट मागत असावेत

 

त्यांचा प्रत्येक श्वास

शेवटच्या न्यायदानाच्या क्षणाइतका फुललेला

आणि चेहर्‍यावर

निर्वाणीच्या सुरकुत्या

 

हे प्रभोSSS

माझा डावा हात वर उचल

स्वर्गात ठेवून दे अलगद उजवीकडे

उजवा असू दे शाबूत

मेंदू आणि हृदयाची एकत्रित मोट

बांधता यावी करकचून दोन्ही खांद्यांना म्हणून

मिनव्हाईल मी

माझा अविनाशी आत्मा

शुद्धीस्थानाच्या कढत कढईत

ठेवतो उकळत

 

२.

कन्फेशन बॉक्सच्या पलिकडे

फादर रोज न चुकता बसतात

 

भाविक येतील

पश्चातापदग्ध

आणि भडाभडा ओकतील

आपल्या अपराधांचा पाढा

ही शक्यता

शेवटच्या दिवसाइतकीच धुसर

 

तरी

आकाशातील बापाने

नेमून दिलेलं काम

फादर आज्ञाधारकपणे पार पाडतायेत.

 

आज्ञा मोडण्याची शिक्षा

हद्दपारी आहे परंपरागत

म्हणून असेल कदाचित

 

किंवा हे कन्फेशन बॉक्स

म्हणजे आकाशातील बापाने दिलेलं

सत्तासन आहे म्हणूनही असेल कदाचित

 

किंवा फ्रॉईड नाही पोहचू शकत

सगळ्यांच्या तळमनात

म्हणून असेल कदाचित

 

किंवा तेवढाच विरंगुळा

 

किंवा आणखी काही उरलेलं नाहीये काम म्हणून

 

कन्फेशन बॉक्सच्या अलिकडे

एकही अपराधी नाही

 

हे प्रभो,

दया कर

माझे सारे अपराध

तुझ्या दयाळू पोटात घाल

आणि हे कन्फेशन बॉक्स

सदेह स्वर्गात घे

 

म्हणजे मी माझ्या

उरल्यासुरल्या अवशेषांसकट

नामशेष व्हायला मोकळा.

 

३.

चर्चबेल

स्वर्गापासून

अवघ्या दोन बोटांवर

 

थबकलेली

 

घण घण घण

आणि उगवतो दिवस

तिच्या शेपटीला बांधलेला

घण घण घण आणि

मावळतो

 

घणघणघण

आणि थबकतो दिवस

एका मरून पडलेल्या कुत्र्यासाठी

श्रद्धांजलीपर

मृतात्मा

चर्चबेलच्या शेपटीला टांगून

चढू लागतो स्वर्ग

 

हे प्रभो,

या मृतात्म्यापासून

सोडव माझी शेपटी

मी सोसलेयत घणघणघण घाव

हा मरतुकडा कुत्रा जेव्हा

हुंगत होता मुतायपुरती जागा

 

४.

वेदीच्या मागे

लाईफ साईज क्रुसावर टांगलेला

येशू

 

इलेक्ट्रीफाईड रक्ताचे थेंब

पायाखालच्या पेल्यात सांडतायत लाईनशीर

 

संशयी बोट पुन:पुन्हा घुसवल्यामुळे

कुशीतली लाकडी जखम चिघळत चाल्लीये

 

ढासळत चाल्लीये लाईफ साईज क्रुसामागची

लार्जर दॅन लाईफ भिंत

 

झिजत चाल्लेलंय लाकडी शरीर

रक्त दिवसेंदिवस डिम होत चाल्लेलंय

 

हे माझे शरीर हे माझे रक्त

घ्या नि खा घ्या नि प्या

हे माझे शरीर हे माझे रक्त

घ्या नि खा घ्या नि प्या

हे माझे शरीर नी रक्त

घ्या नि खा प्या

शरीर रक्त

खा नि प्या चा डेली उद्घोष

निर्वाणीचं दार ठोठावतोय

 

हे प्रभो

डळमळीत होऊ देऊ नको

माझा श्रद्धाळू पाया

ही निष्कलंक भिंत खचली

तर आकाशाचा पडदा उभा फाटेल

आणि ज्यावर मला टांगवलंय

तो अश्रद्धाळू हुकात्मा उघडा पडेल