फ्लॅशबॅक २ (निपचीत तारांबळ)


काय पाहतोयस पटरीकडे
पटरीये ती
तिचा अंत माहित नसला तरी
फिरून फिरून याच ठिकाणी
येणाराय ती
जिथे तुझे डोळे खिळलेलेयत


हात फिरवू नको
डिप्रेस्ड खुंटांवरून
कोनाड्यातलं फिकट हिरवं सलून
सुहास्य वदने तुझ्या स्वागतासाठी सज्जंय

निळ्या लाकडी खूर्चीवर मान टाक
ऐसपैस
नी बैस पाय ताणून आरामशीर

हजामाचा वस्तरा फिरतो दाढीवरून
तेव्हा भणंगसुद्धा असतो राजा

कोकाकोलाच्या हिरव्या बाटलीतला
थंड शिडकावा धुवून काढेल
तुझ्या चष्म्याच्या काचेवरील उदासी

मग दिसेल तुला
या पटरीवर सालोसाल
एकाच जागी खिळला गेलेला वेग


थाडथाड उडतात या रिकाम्या प्रतिक्षारत खुर्च्या
ट्रेन धावते जेव्हा
पटरीवरून

काथ्याच्या गाद्यांची तारांबळ
मग पुन्हा गांड जागच्याजागी हलवून
त्या स्थिरस्थावर होतात
ट्रेन निघून गेल्यावर

पारा उडत चाल्लेला आरसा
भिंतीला अधिकच बिलगू पाहतो
पण भिंत ढीम्म
चेहऱ्यावरची रेषासुद्धा हलू देत नाही
ट्रेन निघून गेल्यावर
आरश्यातला मघाचा वाळत घातलेला कुर्ता
झालेला असतो पसार विदाऊट तिकीट पायजम्यासकट
बनियान आणि अंडरवेयर
पाहत राहतात आरशात आपलं अनाथ रूप
देवादिकांच्या एरवी
रौब झाडणाऱ्या पाच तस्बिरी
मूठ आव्ळून बस्तात
ट्रेन पटरीवरून धावताना
लायटीच्या बॉक्सशेजारी गुमसूम
आणि जीव भांड्यात पडल्यासारख्या
सैलावतात ट्रेन निघून गेल्यावर
कळत नाही त्यांना
सलूनच्या बरकतीची राख झालेली अगरबत्ती
कुठे झाली गायब

कित्येक देहांचा घाम शोषून
पांढरा पडलेला काळा अॅप्रन
उडत उडत निघतो ट्रेनच्या पाठोपाठ
उडून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न
निपचीत पडून राहतो पटरीवर
ट्रेन निघून गेल्यावर
हजाम लगबलीत उचलून आणतो जिंदा लाश
आणि अडकवून ठेवतो गंज पकडलेल्या खिळ्यावर

मिनव्हाईल
हजामाला आपल्या लुंगीशी
करावी लागलेली असते जीवापाड झटापट
आपलं आहे नाही ते सगळं
पडू नये उघडं
ट्रेन पटरीवरून धावताना म्हणून


काय शोधतोयस
तीच ट्रेन पुन्हा कधीच धावत नसते
या निपचीत पटरीवरून
कोनाड्यातल्या सलूनची तारांबळ
नेहमीसारखी तीच

फ्लॅशबॅक १


हाताची बंद मुठ दिसली नाही,
झिंदाबाज तुझ्या घोगऱ्या आवाजातलं
ऐकू आलं नाही आज मैदानात

मोर्या भाई नही तो मजा नही
निदर्शन में, मनाशी पुटपूटलो
आणि माघारी फिरलो

थेट मोर्याच्या दारात
सुस्वा आणि गतमच्यामध्ये
जोडलेल्या हातांमधला
एक हात फळकुटासह गायब
दारातून थेट आत
आरपार पाहण्याची आयती सोय


गायब हाताच्या होलमधून
आवाज दिला
मोर्याभाईSS

आवाज आला नाही
घराचं रिकामेपण हात हलवत आलं
किधर गये?

वो निशाआपा के इधर गये रहेंगे

मेंदूत लफड्याच्या चविष्ट
गमतीजमती शिजवत
सैदून्नीसाच्या फिकट हिरव्या दारात

डिस्टर्ब करू की नकोच्या
द्विधा कात्रीत अडकलेली हाक तशीच गिळून
गप उभा राह्यलो


माझ्या गप उभा राहण्याचा आवाज
आत पोहचला न पोहचला
आणि दारात सैदून्नीसा उभी

मोर्याभाई?

जाओ अंदर म्हणत
ती पाण्याचं पातेलं घेऊन बाहेर
फुटलेल्या पायपाच्या दिशेने झपाझप

लफड्याच्या चविष्ट गमतीजमती
पाण्याची वाफ होवून उडून गेल्या


झिंदाबाद इग्नेसभाय

आवाजाच्या दिशेने पाहिलं
सूर्यकिरणांची एक स्पॉटलाईट
छतातून थेट आत
मोर्या प्रकाशमान

टॉवेल कमरेला गुंडाळून मोर्या
हातातला सफारी शर्ट
आपटत होता
अर्ध्या भिंतीच्या मोरीतल्या दगडावर

किती जोरात आपटलं तर
हा जनमभराचा मळ धुवून निघेल
आणि सफेदी की चमकार चमकेल
याचं गणित मला सुटत नव्हतं

इग्नेसभाय, कलसे तीन दिन
ताई आ रही है बम्बय में

थुंकी आणि शब्द
बाहेर पडण्याची शर्यतघाई

मेरे पास ये एकही कपडा है
तो सोचा इसको आजही धोना पडेगा

मोर्याचं स्वगत संपलं की काय जणू
सूर्यकिरणांची स्पॉटलाईट
सरकली हातातल्या सफारीवर

जनमभराचा मळ वाहून जाताना दिसला.

पुस्तकदिनानिमित्त पुस्तकाशी संवाद

तुझ्यासोबत जगलेला एखादा क्षण
साजरा करावासं कधी वाटलं नाही मला

तुझ्याशी जोडलेली एकही गोष्ट
मला आठवत नाही आज
कि फेसबुकवर डकवता येईल श्टोरी

आठवत नाही कधी घेतलं
मी तुला पहिल्यांदा हातात आणि चाळलं

नाकात साठवून घ्यावासा वाटला नाही
तुझ्या पानांचा वास मला कधी
की तो आज श्वासभरून आठवेल

रोमांचित होण्यासाठी मी
कधीही केला नाही तुला स्पर्श
बेसुमार भुकेच्या काळात
तुला ओरबाडलं, भूक शमली नाही

उलट त्वचेसारखी चिकटली अस्तित्वाला

फसलेल्या संभोगासारखं आपलं नातं
अपराधी डोळ्यांनी
नजर चुकवत राहिलं आजतागायत

अविर्भावाची वाफ

ह्या गारठलेल्या हॉलमध्ये

ओठांवरून जीभ, हॉलभर नजर फिरवत

एक एक शब्द कोरतोय कवी

 

कवीला खात्रीय

जे न देखे रवी ते आपल्याला दिसतंय

आपण जे खरडलय कागदावर

तेच तर उमटलेलं मेंदूत

आणि जे आणि जितकं उमटलेलं

तेच तर आपल्याला समजलय.

त्यापेक्षा वेगळं समजावं असं या जगात आणखी कायंय?

आणि या जगापेक्षा आणखी वेगळं जग

असण्याची काय शक्यताए

आपल्या मेंदूच्या आकारात फिट्ट बसलेल्या या कवितेत

 

शब्द जे या हॉलमधल्या थंडीत

गारठलेल्या इतर मेंदूंच्या आकारात फिट्ट बसताएत

कवीला वाटतं आपण कोरतोय

एकेक शब्द

ह्या हॉलमधल्या गारठलेल्या नास्तित्वावर

 

आणि कवीच्या तोंडून शब्दाऐवजी

बाहेर पडते अविर्भावाची वाफ.

नाही त्यावर?

जेव्हा मी गिरवत होतो नास्तिकतेचे
प्राथमिक धडे

खळखळाट
खळखळाट
खळखळाट

स्वच्छ स्पष्ट लख्ख होतं आकाश
किंवा तसा आभास

मस्तीत होतो चालत
फुल्ली मारत जे जे नाही त्यावर

नाही त्यावर?
प्रश्नाने पुसली बुबूळाची नास्तिक काच

‘न’च्या ब्लॅकहोलमधून
गेलो पलीकडे

अधिक स्वच्छ अधिक स्पष्ट अधिक लख्ख
दिसू लागलं आकाश
किंवा तसा आभास

खळखळाट
खळखळ
खळ

आत्मशोधाच्या पायथ्याशी

  1. असोशी

आत्मशोधाच्या पायथ्याशी

ब्रम्हानंदी मेंदू

 

देहास्तित्व नाकपुड्याशी

आत-बाहेर

 

कण कण

निसटता क्षण

 

हर क्षण

वितळत

 

वि त ळ त

 

तादात्म्याच्या असोशीत

टल्लीन

 

  1. साक्षात्कार

तिलांजलीचा लावला टिळा

लॉजिक कपाळी

कि हे शिखर

धूसर

होते सर

 

तादात्म्य

माझ्या आणि तुमच्या

मेंदूतल्या चिंध्या

 

साक्षात

साक्षात्काराला

सामोरे साक्षीभावी डोळे

 

  1. बुडबुडा

तादात्म्य चिंध्या

इतक्या तादात्म्य

 

कि हलक्या हलक्या

फुलपाखराच्या पंखांइतक्या

 

फुलपाखरू छान किती दिसते

फुलपाखरू

मेंदूत माझ्या आणि तुमच्या

रें गा ळ ते

 

रें  गा  ळ  ते

 

आत्मशोधाच्या

पायथ्याशी

 

फुलपाखरानंदी

बुडबुडा ठो