स्तोत्रगीत ३

तु होतीस एक शक्यता
तु आताही आहेस एक शक्यता
तू पुढेही असणार आहेस कायम एक शक्यता

गिलोटीनखाली धडापासून केलं जात असताना डोकं वेगळं
आम्ही गिरवलं
स्वातंत्र्यसमताबंधुता
ती तुझ्या शक्यतेचीच होती मुळाक्षरं

झारच्या मागास बेंबीतून जेव्हा
उगवलं लाल झाड
तेव्हाही तुझ्या शक्यतेची एक फांदी
होती लोंबकळत मोकळ्या आकाशात

त्यानंतर प्रत्येकवेळी
तुझ्या शक्यतेच्या आशेला तुडवूत
आमच्या हातात आलाय तुझा गोंडस मुखवटा

तुझा अस्सल चेहरा
मुखवट्यासारखा पांघरून सत्ता
आमच्या घशाखाली उतरवते सत्याचं तिचं वर्जन
आम्ही समाधानाचे ढेकर देतो

तुझ्या नाकावरची हलत नाही माशी
जेव्हा आम्ही तुझ्या सर्वसमावेशक छाताडावर थयथयाट करतो.

तु पाण्यासारखी निधर्मी
तु पाऱ्याइतकी अलिप्त
तु गोगलगायीइतकी संथ
कधी पोहचणार शेवटच्या माणसाच्या घरी?

स्तोत्रगीत २

काळाच्या आधी तु नव्हतास

काळाच्या नंतरही

फारतर मेंदूतल्या निष्कलंक पोकळीत

होतास तु दुर्लक्षित कल्पना

तुला कोणी नव्हता वाली

नव्हता कोणी वाल्मिकी

तुला शब्दरूप देईलसा

 

आणि इडन गार्डनमध्ये

एवेच्या हातातील सफरचंदातून

किंवा कुठल्याही जंगलात

आम्ही भवताली फेर धरून नाचत असलेल्या आगीतून

तु अवतीर्ण झालास

 

शाळकरी शेंबडं पोर जसं अवगत करतं

अंगावर ठिकठिकाणी केसं उगवू लागल्यावर

आक्रमक भाषा

तशीच सापडत गेली तुला तुझी भाषा

 

काही प्रश्न होते आमच्या मनात

त्यांचं तु उत्तर झालास

काही आश्चर्याचे धक्के बसले आम्हाला

त्यावर तु उतारा बनलास

भितीने गाळण उडाली आमची

तु तुझ्या मधाळ वाणीने आम्हाला धीर दिलास

शिकार करताना निश्चल पडला

आमच्यातल्या एखादयाचा देह

तु तुझ्या अगम्य भाषेत आमचं सांत्वन केलंस

 

आमच्या मेंदूपलीकडे तु स्वर्गाचा देखावा उभारलास

आणि गांडीखाली नरकाचा काळोख

ज्याच्यात सापडणार नाही माणसाला माणूस

किंवा लागणार नाही मागमूस ईश्वराचा

अशी तजवीज तु करून ठेवलीस ग्रंथबद्ध

 

आमच्या कवितांचे कॉपीराईट्स

तु तुझ्या नावावर करवून घेतले

आमच्या ओव्या आमचे अभंग वचनं दोहे

साऱ्यातून तु होत गेलास संक्रमित

पिढया दर पिढया

तु पाझरत राहिलास आमच्यातून

आमच्या पेनातली संपेपर्यंत शाई

 

आम्ही झाडाखाली चिंतन केलं

सापडवले काही नियम

तर तु आयत्या नियमावर येऊन बसलास नागोबा

आम्ही क्रुसावरून क्षमेचे शब्द उच्चारले

तर तु त्या क्षमेचं

दोन हजार सालाइतकं लांबलचक लचांड

आमच्या मानगुटीवर बसवलंस

भेदाभेद अमंगळ म्हटलं आम्ही

तर तु केलास भेदा-भेदाचा मंगळ

आमच्या कुंडलीत कायमसाठी इन्स्टॉल

 

सरकत राहिलं तुझं निर्दैवी अस्तित्व

आम्ही निर्माण केलेल्या

प्रत्येक व्यवस्थेत

तुझा सत्तातूर डोळा जाणून होता

आमच्या भोळयाभाबडया भक्तीचं सामर्थ्य

तुला अचूक नॉलेज नफ्याचं

दिनदुबळयांच्या सेवेतलं

उभारून ठेवल्यास तु आमच्या भवताली

दहा दिशांना दहा भिंती

विदाऊट विंडोज

आमच्या श्वासा-उच्छवासात तु

माजवून ठेवलीस दहशत नैतीकानैतीकतेची

पापापुण्याची बऱ्यावायटाची

वर करून ठेवली सोय धंदेवाईक

कन्फेशनची सायंटिफीक

 

नास्तिकांच्या निर्दयाळू चिमटीत

सापडलीच होती तुझी मानगुट

तर तु तिथूनही निसटलास

ठेवून त्यांच्या रिकाम्या चिमटीत

सत्तालालसेचं आकर्षक गुलाब

तु कधी झालास सत्तेचं सिंहासन

कधी सत्तेच्या माजूर घोडयावर

होऊन आरूढ अंकित केलंस अंतरिक्ष

 

तुझ्या स्वर्गबंदिस्त ईश्वराने

माफ केला होता आब्राहामाला त्याच्या एकुलत्या मुलाचा बळी

तर त्याच्या बदल्यात तु

आणखी किती जीव करणारहेस स्वाहा

तुझ्या धगधगत्या आगीत

स्तोत्रगीत १

मेंदूतल्या कोणत्याही खिडकीतून

बाहेर डोकावलं की

तुझं विराट दर्शन घडतं

 

तू गाण्यात

तू स्वरात

तू तालबद्ध

तू शब्दांत

तू कवितेत

तू प्रतिमाप्रतिकांत

 

तू आमच्या अडाणी पाठयपुस्तकात

ठाण मांडून बसलेलीयेस

तू आमच्या भोळयाभाबडया मेंदूत

जाळं विणून बसलेलीयेस

 

तू धर्माइतकी चिवटयेस

तू माणसाइतकी प्राचीनयेस

तू गांडूळाइतकी लिबलीबीतयेस

बॉलीवुडच्या तमाम हिरॉयनी

झक मारतात तुझ्या लवचिकतेसमोर

 

हे जगद्व्यापी

तू डॉटकॉमची जननी

नारळातलं आपसूक पाणी

रसाळ तुझी वाणी

तुला अवगत सर्व भाषा

सर्व लिप्या तुझ्या अंकित

तरीही तु अलिखीत

आमच्या सर्व भाषा तुझ्या

इंपोर्टेड बाटलीतलंच दुध चोखतात

आमच्या सर्व बोली

तुझ्या व्यावहारीक पादण्यात गुदमरतात

तू सत्संगाची भाषा बोलतेस

अस्खलीत जाहिरातीतल्यासारखी

जाहिरातीतली भाषा तू

अंगवळतेस आमच्यात सत्संगासारखी

 

तुला तुझं टाकाऊ फायबर ठेवायला

कमी पडली जमीन

आणि सायबरच्या कोंडवाडयात

तू निर्माण केलीस अनलिमीटेड स्पेस

तू वेगाला सेकंदाच्या गिचमीडीत घुसवलंस

तू वेळेला वक्तशीर केलंस रीयल टार्इममध्ये

तू खिळवून ठेवलंस आम्हाला खुर्चीत

तू गोठवून टाकलास आमचा घाम

आमच्या तहानेला तु बॉटलबंद केलंस

आमच्या भुकेला तू आध्यात्मिक उंचीपर्यंत भिडवलंस

 

आमच्या कपडयालत्त्यात तुझं 100% कॉटनाय

आमच्या मुलाबाळांच्या  गळयात

तुझीच एक्झीक्यूटीव टायाय

आमच्या कुटूंबकबिल्याचं

तुझ्याशी पिझ्झाबर्गरचं नातंय

आमचे मेडिटेशनेबल आत्मापरमात्मा

तुझ्या फाइवस्टार मठात आत्मदंगयेत

आमचे सर्व ईश्वर तुझ्या पायाशी लोटांगतायेत

तू ईश्वरपुत्रालादेखील लावतेस रितसर धंदयाला

आम्हाला बनवतेस त्याचं ऑफिशल अनुयायी

 

तू लोकशाहीची नाडी आवळून

तिच्या छाताडावर थयथय नाचतेस

नंतर चुकून कोणी घुसवलंच विमान तुझ्या छाताडात

तर अख्खा अफगाणीस्तान बेचिराख करायला लावतेस

मोदी असो किंवा मनमोहन

तू करत नाहिस भेदभाव दोघांच्याही दाढीत तिळमात्र

चे असो किंवा दांडीयात्रेतला गांधी

तू त्यांना आमच्या टिशर्टावर रंगवून

तुझा नफेखोर इतिहास आणखी उजळ करतेस

 

तुला वारा विझवू शकत नाही

भिजवू शकत नाही तुला पाणी

तुकडे तुकडे झाले तरी तुझं लिक्विड

एकसंध होतं पुन:पुन्हा

नव्याने नव्या अवतारात

नव्या प्रकारे थयथयाट करण्यासाठी

 

हे जगद्व्यापी जगद्जननी

किती पॄथ्व्यांचा चेंदामेंदा

करणारहेस तू

बातमीचा बॉम्ब

बातमी येत आहे, आपली प्रत राखून ठेवा

बातमी येत आहे, आमचं चॅनल वाजवत ठेवा

बातमी येत आहे, आमचं अॅप आजच इन्स्टाॅला

 

मी बातमीची वाट पाहत बसलोय

बातमी म्हणजे लाखातला एकमेव आध्यात्मिक क्षण

मी बातमीची वाट पाहत बसलोय

बातमी म्हणजे मेंदूतल्या मेंदूत ज्ञानाचा स्फोट

मी बातमीची वाट पाहत बसलोय

बातमी म्हणजे तुमच्यातल्या कुतुहलाची बँड वाजवणारा बँडबाजा

मी बातमीची वाट पाहत बसलोय

बातमी येणार असल्याची

बातमी येऊन झालेत बरेच दिवस

मी बातमीची वाट पाहत बसलोय

उत्कंठा ताणली गेलीये

मी बसलोय वाट पाहत

बातमीची वाट पाहत बसलोय

मी वाट पाहत बसलोय बातमीची

बातमी येत आहे

कान टवकारले गेलेहेत

बातमी येत आहे

कोणत्याही क्षणी कानात शिरू शकते

म्युजिक बातमी आधीचं

नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ऐकण्यासाठीची

आध्यात्मिक तयारी म्हणून

बातमी येत आहे

दाखवले जाताहेत वारंवार

बातमीचे ट्रेलर्स

बातमी येत आहे

पाठवले जाताहेत नोटिफिकेशन्स

बातमी येत आहे

वर्तमानपत्रांचे कॉलमच्या कॉलम

एकाच वाक्याने भरलेले

बातमी येत आहे आपली प्रत राखून ठेवा

 

मेंदूतली सारी किल्मिषं दूर सारून

बसून घे मांडीवर मांडी टाकून

गांडीखाली कधीही फुटू शकतो

बातमीचा बाँब

खरं म्हणजे हे

खरं म्हणजे हे एक तलाव आहे

ज्यात पाणी नाहीये

 

आपण अलगद पाय सोडतो तलावात

काठावर बसून

ओले होतात पाय

 

ओंजळ बुडवतो तलावात

ओंजळीतून पाणी पितो

तहान भागते

 

काठावरून पाहतो आपण आपल्यालाच

तलावात सुर मारताना

शिंतोडे उडतात

ते चुकवण्यासाठी आपण मान झटकतो

तरी दोनचार आल्हाद थेंब उडतातच चेहऱ्यावर

 

मग थंडी भरते अंगात

तसे काठावरून लॉगावूट होतो आपण

सुकलेल्या घशातून आवाजही फुटत नाही

एक आधा लीटर बिस्लेरी देना बॉस