स्वार्थ या शब्दाला इतकं लाईटली घेऊ नका

स्वार्थ हा शब्द मी
मेंदूतून बाहेर काढला

आणि त्याला काडी लावली.
आता त्याचा धूर
पसरत चाल्लाय सर्वदूर

माफ करा
स्वार्थ या शब्दाला इतकं लाईटली
घेऊ नका

स्वार्थाचं पेटलं जंगल किंवा पेटवलं
तरी त्यातून निघणाराय
स्वार्थाचाच धूर नि
कोळसा स्वार्थाचा साचून राहणाराय पायाखाली

माफ करा
स्वार्थ या शब्दाला
इतकं लाईटली घेऊ नका

जंगलालाही असतो स्वार्थ
शोषत असतात स्वार्थाचाच कार्बन
तेव्हा जाऊन कुठे मिळतो तुम्हाला तुमच्या
स्वार्थाइतका अॉक्सीजन
माफ करा स्वार्थ या शब्दाला इतकं लाईटली
घेऊ नका

स्वार्थी जंगल पसरत चाल्लं होतं हातपाय
आणि पोटात गडगंज कायकाय
स्वार्थाचा गडद हिरवेपणा मग
डोळ्यांतल्या स्वार्थी बुबूळांना टोचणार नाही काय

माफ करा स्वार्थ या शब्दाला इतकं लाईटली घेऊ नका

स्वार्थाची लागली आग
स्वार्थाचा काळजाला घोर
स्वार्थाचा कानाडोळा
स्वार्थाचा डोळा काना
कुठे पाहतो कुठे निशाना
देवाला माहीत

रांगेतले आणि रांगेबाहेरचे

1.

माझ्या खिशातल्या दोन नोटा

अचानक ब्लॅक झाल्यात

आणि मला माझा स्वत:चाच प्रचंड संशय यायला लागलाय

मी दोन नंबरचा माणूस असल्याबद्दल

माझ्या समोर रांगेतील

प्रत्येकजण ब्लॅकच्या धंद्यात सामील असल्याबद्दल

संशय घ्यायची देखील गरज नाहीये.

माझी ठाम खात्री आहे

आईच्या पर्समध्ये सापडलेल्या नोटा

तिने वर्षभर शेतात केलेल्या ब्लॅकच्या मेहनतीतून

तिला मिळालेल्या आहेत.

मुलीच्या पिगीबँकेत ही काळी नाणी

कुठून आली याविषयी कोणाकडेच हिशोब नाहीये

 

2.

रांगेतले

आणि

रांगेबाहेरचे

अशा दोनच जाती आहेत माणसांच्या

 

मी कधी रांगेबाहेर असतो

कधी रांगेत

 

मी कुठे आहे

यावरून माझ्या चरित्राविषयी

अंदाज व्यक्त केला जातो

किंवा संशय

 

रांगेत असताना

मी

सेक्युरिटीवाल्याला घालतो शिव्या

वेडझवा

एकावेळी तीनजणांना आत सोडतोय

पाचजणांना सोडलं असतं

तर एव्हाना

मी काळ्याचा झालो असतो पांढरा

 

गेलो असतो रांगेबाहेर

ताठ मानेने

 

3.

माझ्या खिशात

आयुष्यात पहिल्यांदाच

सापडते फेक नोट

 

माझा चेहरा

आणि चरित्र

फेक असल्याचा

संशय दाटून येतो

रांगेतल्या

इतर चेहर्‍यावर

 

चाचपतो मी माझं चरित्र

घामाघुम

फाटलेलं

 

आपल्या नकळत आपण

कसे काय उतरलो

या काळ्या धंद्यात

म्हणून मी पश्चातापदग्ध

 

कॅशियरकडून

आत्महत्येचं परवानगीपत्र घेवून

फेक नोटेच्या बदल्यात

मी रांगेतून रफादफा

 

4.

पंतप्रधान रडतो

माझी छाती आणखी फुगते

डोळे आणखी बारीक

 

न्याहाळतो पंतप्रधानांचे ओले डोळे

 

मेंदूतून शिव्यांची लाखोली

चुतीयागिरिये सगळी

 

हृदय ओतप्रोत

भेंचोद

बदलाव तो पक्का आनेवाला है

 

पकावगिरी बंद कर बे

गुण्यागोविंदाच्या शोधात

माझ्या मेंदूत होता एक देश
होता एक ईश्वर
एक धर्म
होता हजारो वर्षे
मुळावलेला घट्ट

ईश्वर या शब्दाला
होतं चिकटलेलं एक चित्र
ज्यात आकाश होतं
आकाशावर महाभारतातले धुरांचे लोट
एक गाब्रीयल
द लास्ट सपर मधले दाढीवाले
आणि मध्ये एक मोठा माझा आजोबा
सफेद दाढीवाला
ज्याच्या डाव्या छातीत होतं
तांबडं काळींज

धर्माच्या जागी होता
संडेस्कूलचा निरागस गोंगाट
‘आपले इवलेसे हात
पोचतील तरी का’ इतक्या उंचीवर
वाजणारी चर्चबेल
डेंजर डॉन फादर डॉमणीक
नन्सच्या गळ्यातला
नन्सच्या मेंदूपेक्षा वजनी क्रॉस
आणि रोज संध्याकाळची कंटाळवाणी रोजरी
जिच्यात माझ्या डोक्यातला ठाकूर
गब्बरसींगला धुधुधुवायचा

देशाचा नकाशा
बगळ्यासारखा उभा होता
एका पायावर कायम
पंधरा ऑगस्टला शाळेबाहेर
फडफडणारा तिरंगा
एक साथ सलामी देंगे
सलामीनंतर मिळणारा खाजा
रोज शाळा सुटतानाचे
जनगनमनचे सूर
नंतर त्यात
ए मेरे वतन के लोगोने
डोळ्यांतून जबरदस्ती काढलेलं
पाणी अॅड झालं देशाच्या जागी

माझ्या मेंदूत होता एक देश
एक ईश्वर
एक धर्म
आणि काल्पनिक होता गुण्यागोवींदा
निरागस त्यांच्यासोबत नांदत
नंतर त्यात
देवंदेशंअनंधर्मासाठीप्राणंघेतलंहाती
वाजायला लागलं
आणि मी गुण्यागोविंदाच्या शोधात
बाहेर पडलो

कविता वाचन @ किताबखाना

हॉलमधील दहशतवादी थंडीत

मी एक कवी दहशतग्रस्त

जगातला कोणता कवी

नसतो दहशतग्रस्तच्या एकमेव उबेमुळे

जाऊ धजलेला कविता वाचण्यासाठी

 

लटपटणारे पाय

घामेजलेले हात

घशाला कोरड

कोणत्या भाषेत सांगू आयोजिकेला

पाण्यासाठीची ओरड

 

कपातल्या कपात थंड केलेली

गरम कॉफी

कुरकुरीतपणा काढून घेतलेली बिस्किटं

सुरकुतलेल्या गालांतून

सांडेल न सांडेलसं हसू

गिळतो कवी

खिशातल्या सभ्य रुमालाने खिशातच

टिपतो गंभीर ओठ

 

आयोजिकेच्या साखरघोळल्या ओठांची हालचाल

फाsssय मिनित्स मोSSS

अँद विल स्ताSSSट द सेशन

टिल देन यू कॅSSSन एक्सचेंSSS

यूओ थॉटस विथीचदरSSS

 

आयोजिका अनभिज्ञ

उगाच्च्या उगाच वाट बघितली

की कवीच्या पोटात कळ मारतेच्या

ग्राऊंड रियालिटीला

अवांतर थंडीने आणखी वाढते कळ

चकाचक वॉशरुमात

कवीची दहशतमुक्तीसाठी यातायात

निष्फळ

 

लेत्स स्टाSSSट ची साम्राज्यवादी अनौन्समेंट

निमंत्रित असल्याने

एकूण तीन रांगांपैकी पहिल्या रांगेत

कवी स्थानापन्न

डाव्या पायावर उजव्या पायाचा

आत्मविश्वास टाकून कवी

कोपर्‍यातल्या अनुभवी कवीसारखाच

आपला सर्जनशील हात

विचारवंत गालफडांवर टेकतो

 

कार्यक्रम संपेपर्यंत मग

दोन्ही कवी मिळून करून टाकतात

पुनर्वसन

बेचिराख पॅलेष्टाइनचं

कवीच्या मेंदूतील आनंद

कवी चिंतनात दंग झाला होता. चिंतनात दंग असताना कवी मेंदूतलं क्रिएटिविटीचं केंद्र शोधत होता. या केंद्रावर एकदा का ताबा मिळवला की प्रचंड कविता प्रसवता येतात अशी कवीची खात्री होती. त्याप्रमाणे दिर्घकाळापासून कवी चिंतन करत होता. चिंतन करता करता कवी खूप एकाग्र झाला. कवीने मेंदूवर पूर्ण लक्ष केंद्रीत केले. मेंदूतलं एकेक निद्रिस्त केंद्र जागवण्यास कवीने सुरुवात केली. एकेक केंद्र जागं होत होतं तसा कवी खोल खोल जात होता. खोल खोल. दूर दूर. जागेपणापासून दूर. निद्रिस्त. निद्रेच्याही पलीकडे. खोल खोल.

ठो ठो ठो

हा तिसरा आवाज. याआधी दोनदा असा आवाज आला होता. त्यावेळीसुद्धा कवीला युफोरियाचा अनुभव आला होता. कवीच्या मेंदूला अत्यानंद झाला होता. ठो ठो ठो आवाजाचा आणि मेंदूला अत्यानंद होण्याचा काहीतरी घनिष्ठ संबंध असावा या निष्कर्षाप्रत कवी सहज पोहचला. कारण या तिसर्‍या ठो च्या वेळीसुद्धा कवीच्या मेंदूत अत्यानंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कवी मेंदूच्या गहन दुनियेत अक्षरश: तरंगत होता. आणि कवीला प्रश्न पडला, यावेळी कोण?

कवीने डोळे उघडले. दक्षिणेकडची खिडकी उघडली. बाहेर पाहिले. कवीने डोळे किलकिले करून पाहिले, यावेळी कोण? कवीच्या निर्मितीक्षम मेंदूला चेतवणारा हा तिसरा कोण? असा प्रश्न कवीला पडताच कवीव्यतिरिक्त ज्यांच्या मेंदुमध्ये खोल खोल आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या असा एक जमाव प्रवेश करता झाला. हा जमाव ठो ठो ठो आवाज यायच्या आधीपासूनच विंगेत तयार असल्यासारखा मंचावर अवतीर्ण झाला होता. कवीने जमावाच्या चेहर्‍यावर निरखून पाहिले. जमावाच्या हातात पोश्टर्स. ओठांवर घोषणा. चेहर्‍यावर अती दु:ख. मेंदूत आनंद होता. कवीने स्वत:कडे बघितले. कवीच्या चेहर्‍यावर दु:ख पसरलं होतं. हातात पेन. पुढ्यात कागद. मेंदूत आनंद.

कवी दु:खानंदातिरेकाने उठला. कोनाड्यातील मेणबत्ती बाहेर काढली. समोर खोल खोल, दूर दूर खोलवर गेलेला मेंदू होता. कवीने त्या मेंदुमध्ये तिसरी मेणबत्ती रुतवली. आधीच्या दोन मेणबत्त्या संपूर्णपणे वितळून मेंदूवर पसरल्या होत्या. मेंदूत खोवलेली तिसरी मेणबत्ती आता जळत होती. मेंदूतील सर्व केंद्रे त्या मंद उजेडात निद्रिस्त. खोल खोल. दूर दूर दूर. पलीकडे. कुठे?

मेंदू आणि मेणबत्ती

बऱ्याच दिवसांनी आज मी माझी विझवून ठेवलेली मेणबत्ती बाहेर काढली. ज्या कोनाड्यातून मेणबत्ती बाहेर काढली तिथे अलगद मेंदू ठेवून दिला. मेणबत्तीचा आणि मेंदूचा कधीच विशेष संबंध येत नाही. तुम्ही एकतर मेणबत्ती हातात धरता किंवा मेंदू कवटीत. दोघांपैकी एक. मग मी मेंदूकडे पाहिलं. मेंदूतील सर्व केंद्रे झोपलेली होती अर्थात.

मग मी रांगेत जाऊन उभा राहिलो. अनेकजण माझ्या आधीपासूनच मेणबत्ती पेटवली जाण्याची वाट बघत उभे होते. शांतता इतकी होती की कँमेऱ्याची क्लिक स्पष्टपणे ऐकू यावी. मेणबत्ती पेटवणारा एक व्यक्ती रांगेतील प्रत्येकाची मेणबत्ती पेटवत पेटवत माझ्या दिशेने जवळ येत होता. तो आणखी जवळ आला. त्याला अर्थातच चेहरा असण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. त्याच्या हातात बातमी होती तिच्याने तो मेणबत्ती पेटवत होता. आजुबाजूला काळोखच काळोख. फक्त मेणबत्तीचा उजेड.

तेवढ्याशा उजेडात तर आम्ही फक्त आमच्या समोरच्याचं अंधारानुकरणच करू शकत होतो. मेंदू नसल्याने अर्थातच आम्हाला काही दिसण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यामुळे मेणबत्तीच्या मिणमिणत्या उजेडात आम्हाला समोरच्याची पाठ तेवढी दिसत होती तेवढ्या पुराव्याच्या आधारे आम्हाला पुढे पुढे चालायचं होतं. पुढे म्हणजे कुठे? कुठे म्हणजे पुढे? असा प्रश्न कदाचीत तुम्हाला पडला असेल. तो आम्हाला पडण्याचा काही प्रश्नच येत नाही.

आमच्या मेंदूतील प्रश्न निर्माण होणारी केंद्रं त्या बिनचेहऱ्याच्या मेणबत्ती पेटवणाऱ्या माणसाने कधीचीच बंद करून टाकलेली आहेत. आणि प्रश्न निर्माण होण्यासाठी मेंदूतील जी एनर्जी वापरली जाणार होती ती सारी एनर्जी मेंदूतल्या दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं जे केंद्रंय त्याठिकाणी एकवटण्यात आली होती. त्यामुळे दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं मेंदूतलं केंद्र अतिसंवेदनशील झालेलं होतं. त्यामुळे बिनचेहऱ्याच्या माणसाने त्याच्या हातातील बातमीने जरासं स्टिमुली दिलं की मेणबत्ती पेटावी तितक्या सहजतेने आमच्या मेंदूतलं दुखावल्या जाणाऱ्या भावनांचं केंद्रं दुखावलं जातं. मग फेस्बुकावर आम्ही आमच्या मेंदूतल्या सर्व शहाणपणाचं खर्चीकरण करून मेंदूतली सर्व केंद्र झोपवून टाकतो व नेहमीप्रमाणे झोपलेला मेंदू कोनाड्यात सुरक्षित ठेवून हातात मेणबत्ती घेऊन रांगेत जाऊन उभे राहतो. या सर्व प्रक्रियेत मला सांगा की आम्हाला प्रश्न पडण्याचा प्रश्न येतो कुठे?

दरम्यान बिनचेहऱ्याचा माणूस ज्या बातमीने आमच्या हातातील मेणबत्ती पेटवत असतो त्या बातमीच्या आजूबाजूला आणखी अनेक बातम्या शिळ्या होत चाल्लेल्या असतात. त्याच्यात कोणीएक पानसरे मारला जाऊन कित्येक दिवस उलटून गेल्याची एक बातमी असते. बाजूलाच कोणी अविजीत रॉय मेंदूतल्या प्रश्न निर्माण होणाऱ्या केंद्रांना जिवंत ठेवण्याचं निरूपयोगी काम करत असल्याचा मोबदला म्हणून त्याच्या बायकोसमोर ठार मारला गेलेलासल्याची बातमी असते. जमिनीचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग राहिलेला नाहीवर शिक्कामोर्तब करणारा कायदा पास झाल्याची एक बातमी असते. मुख्य मथळ्याच्या ठिकाणी असलेली बजेटची निरर्थक आकडेवारी जिला कवटीत घुसण्यास काही फटच शिल्लक ठेवलेली नसते आम्ही ती दिमाखात झळकतसते. या सर्व बातम्यांच्या गदारोळातून बिनचेहऱ्याचा माणूस आमची मेणबत्ती पेटवू शकेल अशा बातमीने आमच्या हातातील मेणबत्ती पेटवत होता. आणि आम्ही त्या मिणमिणत्या उजेडात समोरच्याच्या पाठीकडे पाहत पुढेपुढे चाललो होतो. पुढे म्हणजे कुठे? कुठे म्हणजे पुढे?